२००४ मध्ये कर्करोग झाल्याचं निदान, डॉक्टरांनी म्हटले होते… फक्त सहा महिनेच

0
5

दि.१२(पीसीबी)-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार राजकारणातील कसलेले नेते आहेत. त्यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आणि दुर्दम्य इच्छाशक्ती अनेकांना प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रातच नाहीतर दिल्लीतही त्यांनी मोठी पदं भुषवली. लोकसभा निवडणुकीत भर पावसात त्यांनी सभा घेतली आणि वातावरण पालटले. त्यांचे विरोधकही त्यांची अभ्यासवृत्ती आणि दुरदृष्टीचे कायम कौतुक करतात. पण त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की जेव्हा डॉक्टर्सनी त्यांना आता तुम्ही महत्त्वाची कामं पूर्ण करुन घ्या. तुमच्याकडे केवळ 6 महिन्यांचा कालावधी आहे. त्यावर शरद पवार यांचं असं उत्तर होतं…

एका कार्यक्रमात शरद पवार यांनी 2004 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी कर्करोग, कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली होती. ते उपचारासाठी न्यूयॉर्क येथे गेले. तिथे भारतातील काही निष्णात डॉक्टर्सकडे जाण्यास सांगितले. कृषीमंत्री असताना त्यांना 36 वेळा रेडिएशनचा उपचार घ्यायचा होता. ही बाब अत्यंत वेदनादायी होती. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शरद पवार हे मंत्रालयात काम करायचे. त्यानंतर 2.30 वाजता ते ॲपोलो रुग्णालयात केमोथेरपी घेत होते.

केमोथेरपीमुळे अत्यंत वेदना होत होत्या. त्यांना घरी जाऊन झोपावे लागत होते. त्याचदरम्यान एका डॉक्टराने त्यांना आता सर्व महत्त्वाची कामं लागलीच पूर्ण करून घ्या. तुमच्याकडं केवळ 6 महिन्यांचा कालावधी असल्याचे सांगितले. त्यावर पवार यांनी डॉक्टरला मी या आजाराची चिंता करत नाही. तुम्ही पण कोणतीही काळजी, चिंता करू नका असे उत्तर दिले. पवार यांनी कॅन्सरपासून वाचायचं असेल तर तंबाखू खाऊ नका असा सल्ला दिला आहे.

पत्नीसमोर ठेवली होती ती अट
शरद पवार यांनी एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला होता. त्यानुसार, लग्नापूर्वी त्यांनी पत्नी प्रतिभा पवार यांना एकच मुलं होऊ देण्याची अट घातली होती. ते म्हणाले की आपलं एकच मुलं असावं. मग ती मुलगी असो वा मुलगा. त्यानंतर 30 जून 1969 रोजी पुणे येथे सुप्रिया यांचा जन्म झाला. त्या काळात असा निर्णय घेणं हे कठीण होतं. पण पवारांनी हा निर्णय घेतला होता.

शरद पवार यांची राजकीय कारकीर्द
शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर, 1940 रोजी झाला होता. पवार यांनी त्यांचा राजकीय प्रवास 1967 मध्ये काँग्रेससोबत सुरू केला होता. 1984 मध्ये बारामतीमधून त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. तर 20 मे, 1999 रोजी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत त्यांनी 25 मे 1999 रोजी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला होता.