नवी दिल्ली,दि.१४(पीसीबी) – भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर बँकांमध्ये दोन हजारच्या नोटा जमा करण्यात येत आहे. बँकांमध्ये 23 मे पासून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत, मागील काही दिवसात 2000 रुपयांच्या किती नोटा जमा झाल्यात, याची माहिती आरबीआयने दिली आहे. आतापर्यंत 1.80 लाख कोटी मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या असल्याची माहिती आरबीआयने गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दिली.
आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी माहिती दिली की, 2000 रुपयांच्या जेवढ्या नोटा चलनात होत्या, त्यापैकी आता 50 टक्के नोटा बँकांकडे आल्या आहेत. नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्याच्या दिवसापर्यंत 3.62 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या.
2000 रुपयांच्या 85 टक्के नोटा बँकेत जमा?
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, 2000 रुपयांच्या 85 टक्के नोटा थेट बँक खात्यात जमा केल्या जात आहेत. हे आमच्या अपेक्षेनुसार आहे. बँकांमध्ये नोटा जमा करण्यासाठी कोणतीही घाई, गोंधळ सुरू नसल्याची माहिती त्यांनी दिली. 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी आहे. या नोटा जमा करण्यासाठी घाई करण्याची गरज नाही. आरबीआयकडे चलनाचा पुरेसा साठा आहे. त्यांनी लोकांना वेळ काढून 2000 रुपयांच्या नोटा आरामात जमा करा किंवा बदलून घ्या असेही त्यांनी म्हटले. आपल्यापैकी अनेकांना अखेरच्या क्षणी काम करण्याची सवय असते. मात्र, या 2000 रुपयाच्या नोटा जमा करण्यासाठी कोणीही शेवटच्या दिवसाची प्रतिक्षा करू नये, असे आवाहन त्यांनी केले. सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या 10 ते 15 दिवसांत बँकांमध्ये नोटा जमा करण्यासाठी गर्दी होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.
8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली. त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खरंतर, त्याच वर्षी RBI कायदा, 1934 च्या कलम 24(1) अंतर्गत 2000 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या.
2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या आणि त्यात आणखी कपात करुन 2018-19 मध्ये केवळ 466.90 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही.