१ मे रोजी नारायण सुर्वे यांच्या निवासस्थानी काव्यजागर संमेलन

0
513

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने सोमवार, दिनांक ०१ मे २०२३ रोजी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या निवासस्थानी अर्थातच स्वानंद सोसायटी, रुपा रेसिडेन्सीसमोर, श्रावणी सृष्टीजवळ, गंगानगर, नेरळ (पश्चिम), तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथे पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सासवड येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे हे उद्घाटक असून पिंपरी येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कष्टकरी संघर्ष महासंघ – महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या संमेलनात प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आणि महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील.

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जगदीश कदम (पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान), कविवर्य अरुण म्हात्रे (कवी केशवसुत स्नेहबंध पुरस्कार), रजनी उद्धव कानडे (मास्तरांची सावली कृष्णाबाई सुर्वे सन्मान), डॉ. अभिजित पाटील आणि नंदकुमार मुरडे यांना अनुक्रमे नारायण सुर्वे काव्यप्रतिभा आणि शब्दप्रतिभा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागनाथ पाटील (नांदेड), मनीषा पाटील (सांगली), डॉ. कैलास दौंड (पाथर्डी), खेमराज भोयर (चंद्रपूर), अस्मिता चांदणे (पुणे), प्रवीण पवार (धुळे) यांच्या साहित्यकृतींना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून नारायण सुर्वे यांचे वारसदार कवी म्हणून श्रीनिवास मस्के, वसंत पाटील, भरत बारी, आत्माराम हारे आणि प्रभाकर वाघोले आपल्या कवितांचे सादरीकरण करतील.

विनाशुल्क असलेल्या या संमेलनाचा लाभ सर्व साहित्यरसिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांनी केले आहे.