दि.२१(पीसीबी)- देशातील कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने Income Tax Rules 2026 लागू करण्याचा निर्णय घेतला असून हे नियम १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. या नव्या नियमांमुळे कर भरण्याची प्रक्रिया अधिक डिजिटल आणि सोपी होणार असल्याचा सरकारचा दावा आहे.
नवीन तरतुदींनुसार परदेशातून भारतात सेवा देणाऱ्या डिजिटल कंपन्यांनाही आता कर भरावा लागणार आहे. मोबाईल अॅप्स, ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि सॉफ्टवेअर सेवा देणाऱ्या कंपन्यांना कराच्या कक्षेत आणण्यात आले आहे. तसेच शेअर बाजारातील व्यवहारांची माहिती किमान सात वर्षे जतन करणे बंधनकारक करण्यात आले असून व्यवहार अधिक पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला आहे.
दरम्यान, या नियमांचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावरही होणार आहे. घरभाडे भत्ता (HRA) शहराच्या लोकसंख्येनुसार ठरवला जाऊ शकतो, तर ऑफिसमध्ये मिळणाऱ्या मोफत जेवणावर प्रति जेवण २०० रुपयांपर्यंतच करसवलत मिळणार आहे. याशिवाय १५ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तूंवर कर लागू होणार आहे.एकूणच, नव्या आयकर नियमांमुळे देशातील आर्थिक व्यवहारांवर अधिक नियंत्रण ठेवत कर प्रणाली अधिक आधुनिक, पारदर्शक आणि सुलभ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.









































