१९१ देशांच्या मानवी विकास सूचकांकात भारताची १३२ व्या स्थानावर घसरण

0
219

देश,दि.०९(पीसीबी) – कोरोना महामारीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांची प्रचंड वाताहत उडाली. हिंदुस्थानलाही या महामारीचा मोठा फटका बसला आहे. परिणामी मागील दोन वर्षांत देशातील नागरिकांच्या आरोग्य, शिक्षणासह उत्पन्नाचा विकास बोंबलल्याचे वास्तव संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या ताज्या अहवालातून उजेडात आले आहे. 191 देशांच्या मानवी विकास सूचकांकात हिंदुस्थानची 132व्या स्थानावर घसरण झाली आहे.

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने जाहीर केलेल्या 2021च्या अहवालात हिंदुस्थानींचा विविध प्रकारे विकास खुंटल्याचे म्हटले आहे. 2020च्या अहवालात हिंदुस्थान 131व्या स्थानावर होता. नव्या सूचकांकात हिंदुस्थान एक स्थान मागे आला आहे. देशवासीयांचे सरासरी वय, शिक्षण आणि उत्पन्न याआधारे मानवी विकास सूचकांक तयार केला जातो. या अहवालात हिंदुस्थानचे मानवी विकास मूल्य 0.633 ठेवले आहे. हे मूल्य 2020च्या अहवालातील 0.645च्या मूल्यापेक्षा कमी आहे. 2019मध्ये हे मूल्य 0.645 होते. मागील सलग दोन वर्षांपासून हिंदुस्थानातील मानवी विकास घसरल्याचे निरीक्षण संयुक्त राष्ट्राने नोंदवले आहे.

मानवी विकास निर्देशांकात झालेल्या घसरणीचे प्रमुख कारण आयुर्मानातील वैश्विक घट असल्याचे मत संयुक्त राष्ट्राने व्यक्त केले आहे. आयुर्मानात 2019मधील 72.8 वर्षांवरून 2021मध्ये 71.4 वर्षांपर्यंत घट झाली आहे. तसेच गेल्या दोन वर्षांत अनिश्चिततेचे थर वाढल्याचेही नमूद केले आहे.
एकापाठोपाठ एक संकटांचा सामना

हिंदुस्थानसह जवळपास सर्वच देशांची मानवी विकास सूचकांकामध्ये घसरण झाली आहे. जगभरातील लाखो लोक एकापाठोपाठ एक संकटांचा सामना करीत आहेत. या संकटांमुळे जीवन जगण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. ऊर्जा संकटानेही उग्र रूप धारण केल्यामुळे त्याचा मानवी विकासावर परिणाम झाला आहे. ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी जीवाश्म इंधनावर भर देण्याची गरज असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.