-शेती शाश्वत व समृद्ध करण्यासाठी मुबलक पाणी व तंत्रज्ञान गरजेचे
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) :निसर्गातील पाणी या एकमेव मूलभूत स्रोतांवर भारताची शेती अवलंबून असून ती समृद्ध ठेवण्यासाठी मुबलक पाणी व तंत्रज्ञान आवश्यक असण्याचा सूर शेतीविषयक आयोजित परिसंवादात सर्वच वक्त्यांनी आवाज व्यक्त केला.जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये ‘बीज अंकुरले’ या संवादरूपी कार्यक्रमात ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी, विलास शिंदे (नाशिक येथील कृषी कंपनीचे संस्थापक), किशोर गोरे(न्यू जर्सी, अमेरिका), डॉ. सुधीर भोंगळे (कृषी पत्रकार), आणि केवल पाटील (अल्कोहोल टेक्नॉलॉजिस्ट) हे मान्यवर या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. ज्येष्ठ पत्रकार सुनील चव्हाण व विजय चोरमारे यांनी या सर्वांशी संवाद साधला.
कृषी क्षेत्र हे एकमेव असे क्षेत्र आहे की, ज्यामध्ये काम करणाऱ्या शेतकरी व शास्त्रज्ञ यांनी खऱ्या अर्थाने या देशाला वाचविले आहे. १३५ कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशाला सद्यस्थितीत पुरेसा धान्यसाठा झाला आहे. शेती तंत्रज्ञानावर सातत्याने होणारे विविध प्रयोग यामुळे गुणवत्ता वाढली असल्याने नव्या पिढीने तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा. कारण, छोट्या शेती प्रकल्पासारखी भारताची शेती रचना पाहता त्याची जगाशी तुलना होऊ शकत नाही असे, डॉ. सी.डी. मायी यांनी स्पष्ट केले.
विलास शिंदे यांनी, देशातील शेतकऱ्यांनी अन्नसुरक्षितता निर्माण केली असली तरी, अर्थसुरक्षा तयार होऊ शकली नसल्याची खंत व्यक्त करत प्रत्येक शेतकरी हा उद्योजक आहे या नजरेने बघण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनकर्त्यांनी धोरणे आखण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.
कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञ असलेला किशोर गोरे यांनी आपण एम. टेक झाल्यानंतर कृषीसंशोधनासाठी तयार केलेल्या मशिनरीची पाहणी व माहिती घेण्यासाठी खुद्द अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर हे आपणास भेटले होते अशी सुखद बातमी सांगितली.
डॉ. सुधीर भोंगळे यांनी एकूण भारतात कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी फक्त ७५% शक्ती आपण धरणनिर्मितीसाठी खर्च करीत असल्याचे विसंगत व नेमके चित्र यावेळी मांडले. नदीजोड प्रकल्पाची गरज त्यादृष्टीने महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आगामी काळात संवाद व तंत्रज्ञान ही जग उघडण्याचे आरसे राहणार असल्याचे मत किशोर गोरे यांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांशी संवाद वाढविण्याची गरज विषद केली.
पिंपरीच्या डॉ.डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती व या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी उपस्थित सर्वांचे स्मृतिचिन्ह, रोप व दिनदर्शिका देऊन सत्कार केला.
फोटो ओळ – डावीकडून विजय चोरमारे, डॉ. सुधीर भोंगळे, किशोर गोरे(अमेरिका), विलास शिंदे ,डॉ. सी. डी. मायी, अमित केवल (फ्रान्स), सुनील चव्हाण