१८ लाखाच्या फसवणूक प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांच्यासह सातजणांविरुद्ध गुन्हा

0
56

दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) पुणे: ठेवीदार ज्येष्ठ महिलेसह अनेक गुंतवणूकदारांची तब्बल १८ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. निनाद पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवायला सांगत मुद्दल आणि व्याजाच्या रकमेचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आणि निनाद पतसंस्थेचे अध्यक्ष उदय जोशी यांच्यासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १७ नोव्हेंबर २०२० ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीदरम्यान घडला. विशेष म्हणजे अन्य एका प्रकरणात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी नसताना वार्षिक १२ टक्के व्याजदराची बनावट प्रमाणपत्र देऊन साडेपाच कोटींची फसवणूक केली होती.

याप्रकरणी ७८ वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. निनाद पतसंस्थेचे संचालक तथा माजी नगरसेवक उदय त्र्यंबक जोशी, त्यांची पत्नी शुभदा जोशी, मुलगा मयूरेश, रामलिंग शिवगणे, अशोक कुलकर्णी, वल्लभ जोशी, माजी अध्यक्ष मिथिलेश घोलप, विलास बाम यांच्याविरुद्ध ४२०, ४०६, ३४, एमपीआयडी ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी उदय जोशी यांच्यासह संचालकांविरुद्ध दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत. त्यांचे पती सेवानिवृत्त आहेत. तक्रारदार महिला आणि जोशी कुटुंबीय ओळखीचे आहेत. निनाद पतसंस्थेचे कार्यालय सदाशिव पेठेतील खून्या मुरलीधर मंदिराजवळ आहे. आमच्या पतसंस्थेत मुदतठेवीवर पैसे ठेवल्यास बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ. ज्येष्ठ नागरिकांना एक टक्के जादा व्याज देण्यात येते, असे आमिष ज्येष्ठ महिलेला जाेशी यांनी दाखविले होते. त्यानंतर तक्रारदार महिलेने पतसंस्थेत वेळोवेळी साडेअकरा लाख रुपये मुदतठेव स्वरुपात ठेवले. ठेवींची मुदत सहा महिन्यांपूर्वी संपली होती. जोशी यांनी त्यांना पैसे परत केले नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ महिलेने जोशी यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांना पैसे दिले नाहीत. त्यांनी पाठपुरावा केला. त्यांना अरेरावी करण्यात आली, असे ज्येष्ठ महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.

यापूर्वी उदय जोशी यांच्यावर गॅस एजन्सीत रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे नऊजणांनी तक्रारी दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. गुंतवणूकदारांना आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहनदेखील गुन्हे शाखेकडून करण्यात आले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी नसताना वार्षिक १२ टक्के व्याजदराची बनावट प्रमाणपत्र देऊन गुंतवणूकदारांची पाच कोटी ५३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी आणि त्यांचा मुलगा मयुरेश यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ठेकेदार मंगेश खरे यांनी फिर्याद दिली होती