१३७ कोटी रुपयांचा फसवणुक प्रकरणात ईडी ची कारवाई

0
3

मुंबई, दि. 1३ (पीसीबी) : सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) मुंबई, दिल्ली आणि गुरगावमधील १९ ठिकाणी छापे टाकले, अशी माहिती गुरुवारी दिली. सुमाया-डेंट्सू प्रकरणातील ही कारवाई करण्यात आली असून त्यात ४६ लाख भारतीय चलन, चार लाख विदेशी चलन व तीन कोटी ४० लाख रुपयांचे सोन्याचे लगड जप्त करण्यात आले. मालमत्तांची कागदपत्रे, डिजिटल उपकरणे हेही जप्त करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.

वरळी पोलीस ठाण्यात मे. डेंट्सू कम्युनिकेशन्स इंडिया प्रायव्हेट   लिमिटेड, मे. सुमाया इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्याचे प्रवर्तक यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करत आहेत. त्यांच्यावर १३७ कोटी रुपयांचा फसवणुकीचा आरोप आहे.

मंगळवारी हे छापे टाकण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. शोधमोहिमेत कागदोपत्री पाच हजार कोटींचे व्यवहार दाखवण्यात आले. त्यातील १० टक्के व्यवहारच खरे आहेत. पत वाढवण्यासाठी हे व्यवहार दाखवण्यात आले. त्यामुळे समभागांच्या किमतीत वाढ झाली, असे ईडीकडून सांगण्यात आले. त्यामुळे सुमाया कंपनीची उलाढाल २१० कोटीवरून दोन वर्षांतच ६७०० कोटी रुपयांवर पोहचली. त्यामुळे समभागाची किंमत १९ रुपयांवरून ७३६ वर पोहोचले होते. आर्थिक वर्ष २०१९-२० ते २०२१-२२ या कालावधीत हा प्रकार घडला होता, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली.