१२ ते १३ नोव्हेंबरला मतदान, १६ ला मतमोजणी ?

0
68

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधी, निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु झाल्यात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि त्यांची टीम मुंबईत दाखल झाली आणि तयारीचाही आढावा घेतला. केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्वपक्षीय नेत्यांची बैठकही घेतली.

सध्या जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुका होत आहेत. जम्मू काश्मीर आणि हरियाणात ८ ऑक्टोबरला मतमोजणी आहे. त्यामुळं एक दिवस सोडून १० ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. तसंच सर्व २८८ जागांसाठी २०१९ प्रमाणेच एकाच टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. १२ ते १३ नोव्हेंबरला मतदान आणि १५ किंवा १६ नोव्हेंबरला मतमोजणी होऊ शकते. निवडणुकीत IAS, IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणूक आयोगाकडून करण्यात येतात. मात्र काँग्रेसनं थेट पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनाच पदावरुन हटवण्याची मागणी केली. शुक्ला पदाचा गैरवापर करतील, असा आरोप काँग्रेसचा आहे.

निवडणुकांची घोषणेआधीच महायुती आणि महाविकास आघाडीकडूनही जागा वाटपाचीही घोषणा होऊ शकते. महायुती बद्दल बोलायचं झालं तर २२५ जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. पुढच्या २ दिवसांत मुख्यमंत्री शिंदे फडणवीस आणि अजित पवार सर्व २८८ जागांच्या वाटपावर शिक्कामोर्तब करु शकतात. कारण पहिली यादी ३ ऑक्टोबरला घटनेस्थापनेच्या दिवशी येण्याची शक्यता आहे.

निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केली आहे. तसंच निवडणूक खर्चाची ४० लाखांची मर्यादा वाढवावी अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केलीय. तर काँग्रेसकडून पोलीस महासंचालक पदावरुन रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी केली.