११ मेपासून फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला

0
725

पिंपरी (दिनांक : ०९ मे २०२३) जयभवानी तरुण मंडळ, मोहननगर आयोजित सहा दिवसीय फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला गुरुवार, दिनांक ११ मे ते मंगळवार, दिनांक १६ मे २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे दररोज सायंकाळी ७:०० ते ९:०० या वेळेत खालीलप्रमाणे व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, दिनांक ११ मे रोजी सुप्रसिद्ध वक्ते अशोक देशमुख ‘आनंदी जीवनाची गुरूकिल्ली’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफतील. शुक्रवार, दिनांक १२ मे रोजी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना : आजचे सामाजिक, राजकीय वास्तव!’ या विषयावर विचार मांडतील. शनिवार, दिनांक १३ मे रोजी सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी ‘भारताच्या राजकारणाची दशा व दिशा’ या विषयाच्या माध्यमातून तृतीय पुष्पाची गुंफण करतील. रविवार, दिनांक १४ मे रोजी इतिहासतज्ज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे छत्रपती शिवाजीमहाराज : वर्तमानातील आव्हाने!’ या विषयावर चतुर्थ पुष्प गुंफणार आहेत. सोमवार, दिनांक १५ मे रोजी ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू ‘अरे अरे माणसा तू कधी होशील रे माणूस?’ या विषयावर भारुडांच्या माध्यमातून ‘जगण्याचे अंतिम सत्य!’ मांडतील. व्याख्यानमालेतील अंतिम पुष्प मंगळवार, दिनांक १६ मे रोजी सुप्रसिद्ध वक्ते नितीन बानगुडे – पाटील ‘छत्रपती संभाजीमहाराज : धगधगती अंगारगाथा’ या विषयाने गुंफणार आहेत.

विनाशुल्क असलेल्या या सर्व व्याख्यानांचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केले आहे.