हिंजवडी येथे मंगळवारी (दि. 30) दुपारी एक होर्डिंग कोसळले. याप्रकरणी होर्डिंग मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धार्थ श्रीकांत देवबागकर (वय 36, रा. संगमवाडी, पुणे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय दुधाने (रा. कोथरूड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील विग्बोर स्कूल शेजारी लावलेले होर्डिंग मंगळवारी झालेल्या वादळात कोसळले. होर्डिंग मालकाने लोकांच्या जीवितास, मालमत्तेस व सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अशा पद्धतीने होर्डिंग उभे केले. ते होर्डिंग फिर्यादी यांच्या टायरच्या दुकानावर पडले. यामध्ये दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच तीनजण किरकोळ जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.