होर्डिंग धंद्यात हात धुवून घेणारा भाजपचा `तो` पदाधिकारी कोण, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

0
257

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – किवळे येथील होर्डिंग दुर्घटना प्रकऱणात पाच निष्पाप मजुरांचा बळी गेल्यानंतर या विषयावर सर्वच माध्यमांनी महापालिका प्रशासन आणि राज्यकर्त्यांवर तुफान भडिमार सुरू केला आहे. आघाडीच्या दै. सकाळ ने अवैध होर्डिंगमधून तब्बल ३०० कोटींचा काळाबाजार चालत असल्याचा भंडाफोड केला. अवैध होर्डिंग काढण्याच्या कामात एका भाजप शहर पदाधिकाऱ्यानेच महापालिकेला फसवले आणि चक्क दोन कोटींचा गंडा घातल्याचा गौप्यस्फोट या बातमीतून केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांनी आता भाजपचा `तो` पदाधिकारी कोण याचा शोध सुरू केला असून तो विषय निवडणुकिपर्यंत लावून धरायचे ठरवले आहे. दुसरीकडे आता भाजपमधील निष्ठावंतांपैकी जेष्ठ कार्यकर्ते महेश कुलकर्णी यांनी त्यांच्या फेसबूक पेजवरील पोस्टमध्ये, “अशा प्रकारे शहर पदाधिकाऱ्यामुळेच भाजपची नाहक बदनामी होणार असेल तर `अब की बार १०० पार` कसे होणार, असा रोकडा सवाल केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

महापालिका प्रशासनाने सोयिस्कर दुर्लक्ष केल्याने पाच निष्पाप नागरिकांचे बळी गेले. पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. महापालिका प्रशासनावर सर्वांनी ताशेरे ओढले. `हे बळी नव्हेत तर महापालिका प्रशासनाने केलेले खून होते`, अशी सडेतोड भूमिका `पीसीबी टुडे` च्या चर्चेत मान्यवरांनी घेतली. सकाळ प्रमाणेच दै. लोकमत, पुढारी, प्रभात, पुण्यनगरी, इंडियन एक्सप्रेस, महाराष्ट्र टाईम्स आदी प्रमुख वर्तमानपत्रांनीही या दुर्घटनेतील प्रशासनाचा हलगर्जीपण निदर्शनास आणून दिला. महापालिका आयुक्त शेखर सिंह हे जाहीर पत्रकार परिषदेत सांगताना, शहरात अवघे १४३५ होर्डिंग पैकी ४३५ अवैध असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात शहरात पाच हजारावर अवैध होर्डिंग आणि दहा हजारावर फ्लेक्स असल्याचे दे. सकाळ ने लक्षात आणून दिले. महापालिकेचा सुमारे १०० कोटींचा महसूल बुडाला असून तब्बल ३०० कोटी रुपयांचा काळाबाज चालतो, असेही या बातमीत नमूद केले आहे.
होर्डिंग- फ्लेक्स ठेकेदाराकडून लाच घेताना भाजपच्या सत्ता काळातच स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागने अटक केली होती. दुसरीकडे अवैध होर्डिंग काढून टाकण्यासाठी जो दोन कोटी रुपयांचा ठेका दिला होता तो शहर भाजप पदाधिकाऱ्याशी संबंधीतांचा होता. प्रत्यक्षात अवैध होर्डिंग एवजी अवैध फ्लेक्स काढले आणि दोन कोटीला महापालिकेला गंडा घातला. उस गोड लागला म्हणून मुळासकट खाण्याचा या पदाधिकाऱ्याचा हव्यासच आता सर्व शहर भाजप कार्यकारणीच्या अंगलट आला आहे. भाजपला नामोहरम करण्यासाठी आता तोच मुद्दा विरधकांनी उचलून धरला आहे.

सर्व परिस्थितीची जाण असल्याने भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते महेश कुलकर्णी यांनी फेसबूक पोस्ट लिहून मन मोकळे केले. आपल्या पोस्टमध्ये महेश कुलकर्णी म्हणतात, “मी पण या शहरात संघटनात्मक काम केले व आजही चालु आहे. पण असा बेफिकीर प्रसंग कधी अनुभवला नव्हता. पैशाचा इतक्या हव्यासामुळे भाजपची नाहक बदनामी झाली. लोकप्रतिनिधी व्यतिरिक्त पदाधिकाऱ्यांबद्दल जाहिरपणे असे गंभीर आरोप प्रत्यारोप होत असेल तर संधटनेला १०० सौ पार कसे करता येतील. आपण मात्र `३०० करोड` च्या बातम्या बघायच्या का ?
उपमुख्यमंत्री फडणवीस जी व प्रदेश अध्यक्ष बावनकुळे च यावर लक्ष घालुन समस्येला दुर करु शकतील का ?“
भाजप नगरसेवक काय किंवा पदाधिकारी काय बेकायदा वागत असेल तर जाब विचारायचे काम संघाचे कार्यकर्ते कर असतात. हे पत्रसुध्दा त्याचेच एक प्रात्यक्षिक आहे. आता काय कारवाई होते ते पाहू.