होय मी नाराज आहे, भाजपा खासदार स्पष्ट बोलले

0
410

पुणे, दि. ६ (पीसीबी) : राज्यातील सत्तांतरापासून शिवसेना-भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे. भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या जसजशी वाढत आहे. तसतसे भाजपच ताकदही वाढत चालली आहे. काहीही करुन सत्ता मिळवचीच यासाठी भाजप प्रत्येक मार्ग अवलंबताना दिसत आहे. या सर्व प्रकारावर मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केला आहे.

सत्तेची गणिते जुळविण्याच्या प्रयत्नात भाजप नेत्यांनी पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक बासनात गुंडाळून ठेवली आहे. सत्ता मिळवण्यासाठी कोणालाही पक्षात प्रवेश दिला जात आहे. भाजपकडून सत्तेची गणिते जुळवण्याच्या प्रयत्नात निकषही बदलले आहे. पक्षाशी बांधिलकी असलेले भाजपचे सच्चे कार्यकर्ते राहिले नाहीत.या सर्व प्रकाराबाबत मी नाराज आहे, अशा शब्दांत भाजपचे पुण्याचे खासदार गिरिश बापट यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर भाजपसह सर्वच पक्षांवर आपण नाराज असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणताही कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो. पण कार्यकर्ताच नसेल तर पक्ष कसा उभा राहणार. पण आता कार्यकर्तेही पैसे घेऊन जमा करावे लागतात. आता राजकरण म्हणजे सत्ता किंवा सत्तेची पदे मिळविणे एवढे ध्येय आता कार्यकर्त्यांच्या समोर दिसत आहे. पण गोर गरीब जनतेची छोटी-मोठी कामे करून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हे राजकारणात महत्त्वाचे आहे.

आज प्रत्येकाला नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार व्हायचे आहे. कार्यकर्त्यांमध्येही तशी चढोओढ सुरु झाली आहे. हे सर्व पाहून राजकारणाचा स्तर खालावल्याचे दिसत आहे. कार्यकर्त्यांकडे वैचारिक बांधिलकी नाही. नेत्यांचे, मंत्र्यांचे लांगुनचालन करणे, हार-तुरे देताना छायाचित्रे काढणे, फलक लावणे यातच कार्यकर्त्यांना धन्यता वाटते. या गोष्टी माझ्यासारख्याला पटत नाही. त्यामुळे सर्वच पक्षांवर मी नाराज आहे.

कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने किमान दहा वर्षे पक्ष संघटनेत काम केल्याशिवाय त्याला कोणतेही पद दिले जाऊ नये, हा नियम सर्व पक्षांनी पाळला तर राजकारणातील स्तर टिकून राहू शकतो. पण अलीकडच्या काळात निवडणूक जिंकण्यासाठी दारूड्यालाही जवळ केले जाते. पण अशा गोष्टी माझ्या सारख्या जुन्या कार्यकर्त्यांना सहन होत नाही. या सर्वांबाबत कोणीतरी बोललचं पाहिजे. भाजपलाही सत्ता हवी आहे. त्यामुळे कोण निवडून येईल, कोण निवडून येणार नाही, हे लक्षात घेऊन भाजपकडून सत्तेची राजकीय गणिते जुळवली जात आहेत. पूर्वी निवडणुकीतील अनामत रक्कमही जप्त झाली तरी चालायचे. पण आता सत्तेसाठी कोणालाही पक्षात घेणे सुरु आहे. या सर्व प्रकारामुळे मी व्यथित झालो आहे. अशी खंतही बापट यांनी बोलून दाखविली.