होय, मंत्री संजय राठोड हाच खरा गुन्हेगार

0
301

– चित्रा वाघ यांच्या विधानामुळे भाजप-शिंदे गटात तणाव

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – “मला माहित आहे की, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड हाच खरा गुन्हेगार आहे, मी त्या मतावर आजही ठाम आहे आणि माझी लढाई यापुढेही चालू राहणार“, असे स्पष्ट विधान भाजपच्या नवनियुक्त महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले आहे. एका पत्रकार परिषदेत श्रीमती वाघ यांना पत्रकाराने खोदून खोदून विचारले असता त्यांनी संतप्त स्वरात आपले मत मांडले. दरम्यान, श्रीमती वाघ यांच्या या विधानामुळे आता राज्यातील भाजप आणि शिंदे गटात तणाव असून वितुष्ट वाढण्याची शक्यता आहे. मंत्री राठोड यांच्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडणार असेही सांगण्यात आले.

शनिवारी (१२ नोव्हेंबर) भाजप आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमती चित्रा वाघ आणि एका पत्रकाराची जोरदार खडाजंगी झाली. या प्रकऱणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पत्रकाराने श्रीमती वाघ यांना पूजा चव्हाण प्रकरणात आपण पूर्वी जितक्या आक्रमक होतात तितक्या आता नाहीत, आपल्या आरोपांमुळे एका नेत्याचे राजकिय करिअर बरबाद झाले नाही का, अशा आशयाचा प्रश्न विचारला. या मुद्यावर श्रीमती वाघ खूप आक्रमक झाल्या आणि त्यांनी स्पष्टच सांगितले की, “मला माहिता आहे की पूजा चव्हाण प्रकरणात तो मंत्री संजय राठोड हाच खरा गुन्हेगार आहे, आजही मी त्या मतावर ठाम आहे आणि माझी ही लढाई चालूच राहणार.“ पत्रकारांनी अशा प्रकारे सुपारी घेऊन प्रश्न विचारणे चूक असल्याचे ताशेरे श्रीमती वाघ यांनी ओढले. हा सर्व संवाद तुम्हाला व्हायरल करायचा तर करा, माझी कोणतीही हरकत नाही, असेही त्या म्हणाल्या.

मंत्री संजय राठोड हा या पूर्वीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात समाजकल्याण राज्यमंत्री होता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकऱणातील त्याची ओडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाल्याने अखेर त्याचा राजीनामा घेणे ठाकरे यांना भाग पडले. त्यावेळी श्रीमती वाघ यांनी ठाकरे सरकार विरोधात याच विषयावर रान पेटवले होते. राज्यात सत्तांतर होताच तोच राठोड पुन्हा शिंदे गटात सामिल झाला आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात पुन्हा त्याचा समावेशही करण्यात आला. श्रीमती वाघ या भाजपमध्येच असल्याने आता त्या गप्प का, असा सवाल लोक विचारत होते त्यावेळी आपण हे प्रकरण सोडलेले नाही, त्याचा पाठपुरावा करणार असे त्यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात वाघ यांनी आपली तलवार म्यान केल्याचे दिसले.

दरम्यान, श्रीमती वाघ यांच्या त्या विधानामुळे आता राज्य सरकारला आगामी काळात निष्पाप पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेला मंत्री संजय राठोड यांचे प्रकरण जड जाणार आहे, अशी चर्चा रंगली आहे.