होय, घराणेशाहीचा निःपात हवाय, पण भाजपामधील घराणेशाहिचे काय – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
371

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण सामान्य जनतेला खूप खूप भावले. अगदी लोकांच्या मनातले ते बोलले. हे भाषण म्हणजे २०२४ मध्ये भाजपाच हॅट्रीक करणार याची नांदी होती. तासाभराच्या भाषणात मोदींनी पाच संकल्प सोडले. त्यात पुढच्या २५ वर्षांत विकसीस भारत हा पहिला सकल्प. गुलामीचा अंश मिटवणे हा दुसरा संकल्प. भारताच्या समृद्ध वारशाचा अभिमान हा तिसरा संकल्प. एकता आणि एकजूट महत्वाची, हा चौथा संकल्प आणि नागरिकांकडून कर्तव्याचे पालन हा पाचवा संकल्प. याहीपेक्षा भावूक होत भ्रष्टचार आणि घराणेशाहीवर ज्या तळमळीने मोदी बोलले ते सर्वांच्याच मनाला लागले. लोकशाही अधिक सदृढ होण्यासाठी मोदींच्या या विचारांचे किमान भाजपाने तरी गल्ली ते दिल्ली तंतोतंत पालन केले पाहिजे. उक्तीला कृतीची जोड मिळाली तर लोक भाजपाला कायम डोक्यावर घेतील. मुंहमे राम बगल मे छुरी असे नसावे. कारण स्वातंत्र्योत्तर काळात एकाही नेत्यावर नव्हता इतका गाढा विश्वास आज मोदींवर आहे. तो सार्थक ठरला पाहिजे अन्यथा उद्या अराजक माजेल. केवळ भाजपासाठी नव्हे तर देशातील लोकशाहिसाठी मोदी कोणत्याही परिस्थितीत यशस्वीच झाले पाहिजेत. कारण दूर दूरपर्यंत आज दुसरा पर्याय समोर दिसत नाही. काँग्रेस मरनासन्न झाली आहे, तर डावे पक्ष लयाला गेलेत. तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा, आप, जनतादल, द्रमुक, टीडीपी, शिवसेना, राष्ट्रवादी अशा छोट्या प्रादेशिक पक्षांचे सरदार तडजोडीच्या राजकारणात मेटाकुटीला आलेत. मोदींना शह देण्यासाठी एकत्र येतात आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांना वाकुल्या दाखवतात. नितीशकुमार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, शरद पवार यापैकी एकही नेता ही मोट बांधू शकत नाही आणि मोदींच्या पासंगालाही पूरणार नाही. भाजपाचा वारु आता एकदम सुसाट सुटलाय. महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदी हे प्रश्न तीव्र झालेत, पण ते आता मोदीच सोडवू शकतील, असे जनतेला वाटते. त्यामुळे घराणेशाहीचा एक मोदी बाण अनेकांची शिकार कऱणार आहे.

छोटेपक्ष संपविण्याचे भाजपाचे कारस्थान –
काँग्रेस संपविण्याचा विडा नरेंद्र मोदी यांनी उचलला आणि जवळपास तो तडिस नेला. जिथे देशभर सत्ता आणि ४०० वर खासदार होते तिथे आज अवघे ४७ खासदार आणि सात-आठ राज्यापुरता हा पक्ष सिमीत राहिला आहे. नेहरु-गांधी घराणेशाहीत काँग्रेस बुडाली. पाच पिढ्या झाल्याने लोकही कंटाळले. सोनिया नंतर राहुल किंवा प्रियांका यांना लोक स्वीकारत नाहीत, हे वारंवार उघड झाले. पूर्वीच्या राजेशाहीचा पगडा भारतीयांवर होता आता लोक शहाणे झाल्याने संस्थानिक किंवा राजे महाराजे यांना ती किंमत राहिलेली नाही. लोकशाही परिपक्व होत असल्याचे ते लक्षण आहे. देशातील छोट्या मोठ्या काही राजकीय पक्षांमधील घराणेशाहीला कार्यकर्तेसुध्दा कंटाळलेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात मुलायमसिंह – अखिलेश यादव या बाप बेट्यांचे घराणे, बिहारमध्ये जेडीयू मध्ये लालू-राबडी या पती पत्नी आणि त्यांची पिलावळ नोकशी वाटते. ओडिशा मध्ये बिजू जनता दलात पटनाईक यांचे तीन पिढ्यांचे राज्य आहे. दक्षिणेत तमिळनाडूला द्रवीड मुनेत्र कळघम् चे दिवंगत एम करुनानिधी यांचे जावई-कन्या आंध्रात तेलगू देसम चे एनटीआर चे जावई चंद्रबाबू आणि त्यांचे वारसदार, महाराष्ट्रात शिवसेनेतील ठाकरेंच्या तीन पिढ्या तसेच राष्ट्रवादीतील पवार घराण्याच्या बाप-लेक, दोन पुतणेंचे राज्य तिकडे कश्मिरमध्ये शेख अब्लुल्ला, फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला असे तिन पिढ्यांचे राज्य अशी सगळी घराणेशाही हे लोकशाहितील एक प्रकारची गुलामगिरीच आहे. या सर्व घराण्यांकडे गेली कित्तेक वर्षे सत्ता, पैसा, मत्ता हातात असल्याने ते एकप्रकारचे राजे बनले आणि जनता गुलामच राहिली. ही आधुनिक प्रकारची सरंजामशाही हाणून पाडण्यासाठी मोदींनी घराणेशाहिचा मुद्दा अचूक हेरला आणि आता त्यावर प्रहार सुरू केलेत. मतदारांना हा मुद्दा १०१ टक्के पटणारा आहे. या घराणेशाहीमुळे कित्तेक पटीत चांगले टॅलेंट असलेल्या लोकांना डावलण्यात आले. घराणेशाही लोकशाहिच्या मुळवर कशी आली ते मोदी पटवून देतात. आता त्यावर सविस्तर मंथन झाले की भाजपाला अपेक्षित जनमत तयार होणार. त्यातूनच छोट्या पक्षांची मक्तेदारी संपुष्टात येणार आणि भाजपाला मैदान साफ होणार आहे. शिवसेना हे त्यासाठी उत्कृष्ठ उदाहरण आहे.

राज्यात घराणेशाहीमुळेच भाजपाची सत्ता –
घराणेशाहिच्या मुद्यावर भाजपा रान पेटवत आहे. देशात त्याला यश मिळेल यात शंका नाही, पण महाराष्ट्रा पुरता विचार केला तर आज भाजपाच्याच बुडाखाली अंधार आहे. भाजपाने शिवसेनेची शिडी केली आणि शिखरावर पोहचताच शिडी फेकून दिली. महाराष्ट्रात सत्ता पाहिजे तर तमाम पाटील, देशमुखांना हाताशी धरले तरच सत्ता मिळू शकते हे भाजपाने ओळखले. महाराष्ट्रातील ही सर्व तालेवार मंडळी पिढ्यानपिढ्या सुरवातीला काँग्रेसबरोबर होती आणि आता काही अंशी राष्ट्रवादी बरोबर आहेत. महाराष्ट्रावर त्यातलीच मोजकी १८ घराणी राज्य करतात. भाजपाने तेच लक्ष्य ठेवले आणि घराघरात भांडण लावून आपली पोळी भाजून घेतली. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील राधाकृष्ण विखे यांचे वडिल, आजोबांची हयात काँग्रेसमध्ये गेली. स्वतः विखे काँग्रेस नंतर शिवसेनेत आणि आता भाजपामध्ये आहेत. त्यांचे चिरंजीव सुजय भाजपाचे खासदार आहेत. अशी तीन-चार पिढ्यांच्या घराणेशाहिची यादी खूप मोठी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे राजकारण घराणेशाहिवरच पोसले म्हणून भाजपा वेगळी वाट चोखाळत असेल तर त्याचे स्वागत व्हायला पाहिजे. पण गेली वीस वर्षे भाजपा महाराष्ट्रात स्थिरस्थावर झाली, ती केवळ घराणेशाहिवर हे विसरता येणार नाही. भाजपामध्येसुध्दा घराणेशाही फोफावली आहे, ते प्रथम बंद झाले पाहिजे. मोदींचे पाच भाऊ आहेत, पण एकालाही त्यांनी राजकारणात प्रवेश दिला नाही. इथे मुंडे-महाजन यांची दुसरी पिढी खासदार- आमदारकीवर पिढीजात हक्क असल्यासारखी तटून बसलीत. अनेक खासदार, आमदार, नगरसेवकांच्या पत्नी, मुला-मुलींना, सुना-नातवंडांना निवडूण येण्यासाठी मोदींचाच शिक्का पाहिजे. घराणेशाहिचा खरोखर निःप्पात करायचाच, तर आता भाजपाने स्वतःच्या घरातून सुरवात करावी. आगामी सर्व निवडणुकांसाठी हा निकष लावावा. इतरांपेक्षा वेगळे असल्याचे दाखवून द्या.
महाराष्ट्रात पाटील, भोसले, पवार, देशमुख, विखे, कोल्हे, काळे, कदम, शिंदे, हिरे, मोहिते, जाधव, वळसे, जगताप, काकडे, निंबाळकर, पटेल, मेघे, महाडिक यांच्याशिवाय अलिकडे मुंडे, महाजन, क्षिरसागर, कूल, पिचड, राणे, ठाकरे अशी घराणीच राज्य करत आलीत. रिक्षावाले एकनाथ शिंदे किंवा बावनकुळे, पानटपरीवाले गुलाबराव पाटील क्वचित दिसतात. निवडणुकिला पाच-दहा कोटींचा निधी असेल तरच उमेदवारी देण्याची काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची अट असते. भाजपाने असले जमीनदार, वतनदार, सरदार सोडून फाटक्या परंतु कट्टर देशाभिमानी, सेवाभावी कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. आता गपीनाथ मुंडे यांची कन्या म्हणून पंकजा मुंडे यांना पुन्हा पुन्हा संधी का देत नाही, ते लक्षात आले असेल. मोदींनी गाव, तालुका, जिल्हा आणि राज्यात हेच सूत्र कठोरपणे राबवले तर खऱ्या अर्थाने लोकशाही सर्वसमावेशक होईल. गेली ७५ वर्षांची ही गुलामी तोडायचे धाडस मोदी करत असल्याने ६०-७० टक्के जनता त्यांच्या मागे उभी राहील. भाजपाच्या लोकसभेतील ३०३ च्या जागा उद्या ४०० झाल्याच तर आश्चर्य वाटू नये. कारण हजार वर्षांची मोगलांची, दीडशे वर्षांची इंग्रजांच्या गुलामीतून देश स्वातंत्र झाले. गेली ७५ वर्षे स्वकियांच्या गुलामीत लोक गुरफटलेत त्यांना मुक्त करायचे आहे.