हॉस्पिटल उडवण्याची धमकी देण्यासाठी वापरली ‘व्हीपीएन पध्दत’; पोलिसही चक्रावले

0
100

चिंचवड, दि.२१ – पिंपरी चिंचवड शहरातील तीन हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या संशयीतांनी व्हीपीएन पद्धत वापरून मेल केला. या अत्याधुनिक पद्धतीमुळे पोलीस देखील चक्रावले आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी थेट गुगलकडे धाव घेतली आहे.

निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धन्वंतरी रुग्णालयाला रुग्णालयात बॉम्ब ठेवला असल्याचा रविवारी (दि. 18) सायंकाळी सव्वा सहा वाजता मेल आला. त्यामुळे रुग्णालयात चांगलीच धावपळ उडाली. रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. निगडी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. निगडी पोलिसांनी बॉम्ब शोधक नाशक पथकाला पाचारण केले. या पथकाने रुग्णालयाचा संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

शहरातील आणखी दोन रुग्णालयांना मेल
निगडी मधील धन्वंतरी रुग्णालयानंतर भोसरी परिसरातील मेडिक्लोवर आणि चिंचवड येथील मोरया या रुग्णालयांना देखील अशाच प्रकारचा मेल प्राप्त झाला. खबरदारी म्हणून पोलिसांनी या दोन्ही रुग्णालयात धाव घेऊन संपूर्ण परिसर पिंजून काढला. यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

धमकीच्या मेलमध्ये लिहिले आहे की…
पिंपरी चिंचवड शहरातील तीनही रुग्णालयांना आलेल्या मेलमध्ये एका दहशतवादी संघटनेचे नाव वापरण्यात आले आहे. ‘मी हॉस्पिटलच्या बिल्डिंगमध्ये बॉम्ब ठेवला आहे. हे बॉम्ब हॉस्पिटल मधील बेड आणि बाथरूम मध्ये ठेवले आहेत. हॉस्पिटल मधील एकही व्यक्ती जिवंत राहणार नाही. यामागे दहशतवादी चिंग आणि कल्टीस्ट यांचा हात आहे’ असा धमकीच्या मेलमध्ये मजकूर आहे.

निगडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
या धमकी प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात [email protected] या मेल धारक अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुधीर रंगराव पाटील (वय 71, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. सदर ई-मेल धारकाने हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करण्यासाठी अफवा पसरवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

देशभरात 50 ते 60 ठिकाणी एकच धमकी
अज्ञात मेलधारकाने देशभरातील नामांकित हॉस्पिटल, शाळा, मॉल मध्ये बॉम्ब असल्याबाबत धमकीचे 50-60 जणांना मेल पाठवले आहेत. यामध्ये जयपुर मधील मोनीलेक हॉस्पिटल, सी के बिर्ला हॉस्पिटल, मानस हॉस्पिटल, अपेक्स हॉस्पिटल, रुंगटा हॉस्पिटल, गुरुग्राम हरियाणा मधील ॲम्बिअन्स मॉल, नवी मुंबई वाशी मधील प्रॉमिनंट मॉल, दिल्ली एनसीआर मधील काही शाळांचा समावेश आहे. पुणे शहरातील नोबेल रुग्णालय आणि फिनिक्स मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल पुणे पोलिसांना मिळाला होता.

व्हीपीएन म्हणजे काय
व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) हे सायबर सुरक्षेसाठी बनविण्यात आलेले नेटवर्क असते. आपले संगणक, मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट सायबर हल्ल्यापासून सुरक्षित राहण्यासाठी हे नेटवर्क तयार केले जाते. मात्र काही लोक याचा दुरुपयोग करून इतरांना धमकीचे मेल पाठवणे, मेसेज करणे अशी कामे करतात. यामुळे मेल, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा आयपी ॲड्रेस समोरच्या व्यक्तीला सहजासहजी सापडत नाही. पिंपरी चिंचवड शहरातील धमकी प्रकरणात अशाच प्रकारचे नेटवर्क वापरले असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस गुगलच्या दारी
हॉस्पिटल धमकी प्रकरणातील संशयित आरोपींनी नेटवर्क वापरले असल्याने संबंधित वापरकर्त्याचा आयपी ॲड्रेस जाणून घेण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी थेट गुगलकडे धाव घेतली आहे. संबंधित मेल पाठवणाऱ्या संगणकाचा नेमका आयपी ॲड्रेस काय आहे, तो कुठून पाठवण्यात आला आहे, याबाबतची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुगलकडून मागितली आहे.