दि.१६(पीसीबी)-जगातील अत्यंत महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक असलेल्या हॉर्मुझ सामुद्रधुनीतूनपुन्हा सुरळीत जहाज वाहतूक सुरू करण्यासाठी इराणशी थेट संवाद हाच सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी जहाज वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी विविध देशांनी आपली युद्धनौका पाठवाव्यात, असे आवाहन केले आहे. अमेरिकेने आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर इराणकडून दिल्या जात असलेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हा तणाव वाढल्याचे मानले जात आहे.
जयशंकर यांनी स्पष्ट केले की, भारतीय ध्वज असलेल्या जहाजांसाठी कोणताही ‘ब्लँकेट अरेंजमेंट’ करण्यात आलेला नाही. तसेच इराणला त्याबदल्यात कोणतीही विशेष सवलत देण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
युरोपीय देश भारताच्या पद्धतीचे अनुकरण करू शकतात का, असा प्रश्न विचारला असता जयशंकर म्हणाले की, प्रत्येक देशाचे इराणसोबतचे संबंध वेगळे असतात, त्यामुळे त्यांची थेट तुलना करणे कठीण आहे. मात्र भारताचा अनुभव आणि संवादाची भूमिका इतर देशांसोबत शेअर करण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, भारताच्या ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ या दोन एलपीजी वाहतूक करणाऱ्या जहाजांनी सुमारे ९२,७१२ मेट्रिक टन द्रवित पेट्रोलियम गॅस घेऊन हॉर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली, ही घटना राजनैतिक संवादातून मिळालेल्या सकारात्मक परिणामाचे उदाहरण असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.जागतिक तेल पुरवठ्यापैकी जवळपास २० टक्के तेल हॉर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक होते, त्यामुळे या मार्गावरील स्थैर्य हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.









































