“हॉर्मुझ संकटात जग चिंतेत, पण चीन ‘रेडी’ तेलपुरवठ्यासाठी आधीच मजबूत तयारी”

0
2

दि.१७(पीसीबी)-अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला असून त्याचा थेट परिणाम जागतिक तेल बाजारावर होत आहे. हॉर्मुझ हा जगातील अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असून सुमारे २० टक्के म्हणजे दररोज जवळपास २ कोटी बॅरल तेलाची वाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे येथे कोणताही अडथळा निर्माण झाल्यास जागतिक तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्याच्या तणावामुळे टँकर वाहतूक कमी झाली असून कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत, त्यामुळे अनेक देश चिंतेत आहेत. भारताने या परिस्थितीत कूटनीतीचा मार्ग स्वीकारत इराणशी चर्चा केली आणि अडकलेली काही भारतीय जहाजे सोडवून घेतली.

जगातील बहुतांश देश या परिस्थितीमुळे तणावाखाली असताना चीन मात्र तुलनेने निर्धास्त असल्याचे दिसत आहे. यामागे चीनची दीर्घकालीन ऊर्जा रणनीती कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. चीनने गेल्या दोन दशकांत देशभरात मोठ्या प्रमाणावर रणनीतिक तेल साठे उभारले असून कोट्यवधी बॅरल कच्चे तेल साठवून ठेवले आहे. या साठ्यांमुळे चीनला १०० दिवसांहून अधिक काळ तेल पुरवठा सुरळीत ठेवता येऊ शकतो. याशिवाय चीनने ऊर्जा स्त्रोतांचे विविधीकरण केले असून मध्य-पूर्वेबरोबरच रशिया, आफ्रिका, मध्य आशिया आणि लॅटिन अमेरिका येथूनही तेल आयात वाढवली आहे.

रशियासोबतच्या पाइपलाइन नेटवर्क आणि दीर्घकालीन करारांमुळे चीनला थेट तेल आणि गॅस पुरवठा मिळतो, त्यामुळे समुद्री मार्गांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तसेच चीन-इराण दरम्यान २५ वर्षांचा रणनीतिक करार असून त्याअंतर्गत चीन इराणच्या पायाभूत सुविधा आणि ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करतो आणि त्याबदल्यात स्थिर व तुलनेने स्वस्त तेल मिळवतो. ऊर्जा सुरक्षेसाठी चीनने ‘बेल्ट अँड रोड’ उपक्रमांतर्गत आशिया, मध्य-पूर्व आणि आफ्रिकेत बंदरे, पाइपलाइन आणि कॉरिडॉर विकसित केले आहेत, ज्यामुळे पर्यायी ऊर्जा मार्ग तयार झाले आहेत.

चीन नेहमीच सैन्य संघर्ष टाळून कूटनीतीचा मार्ग स्वीकारण्यावर भर देतो, त्यामुळे जागतिक तणावाच्या परिस्थितीतही तो संतुलित भूमिका घेतो. एकूणच, हॉर्मुझ सामुद्रधुनीतील अस्थिरतेमुळे जागतिक तेल बाजारात अनिश्चितता वाढली असली तरी दीर्घकालीन नियोजन, मजबूत साठे आणि विविध पुरवठा स्त्रोतांमुळे चीन इतर देशांच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि मजबूत स्थितीत असल्याचे स्पष्ट होत आहे.