लोणावळा, दि. १६ (पीसीबी) – लोणावळ्यातील हॉटेल व्यवसायिकाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील भाषा वापरत शिवीगाळ केल्या प्रकरणी पूर्व मुंबईच्या पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. लोणावळ्यातील हॉटेल एरॉन रिसॉर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिल वडगामा वय- ५६ रा. लोणावळा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. वर्षभर अल्पवयीन मुलीचा मानसिक छळ आणि विनयभंग केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. १७ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने पूर्व मुंबई पंतननगर पोलिसात तक्रार दिली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी ही पूर्व मुंबई घाटकोपर या ठिकाणची आहे. पीडित मुलीची आई टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करते. यानिमित्त पीडित मुलीची आई ही लोणावळ्यात यायची. सोबत पीडित मुलगी ही असायची. अनिल वडगामा हे त्यांच्या व्यवसायात पैश्यांची मदत करत होते असे तक्रारीत म्हटले आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही आरोपी अनिलला ‘अंकल’ म्हणत. परंतु, अनिल वडगामा हा अल्पवयीन मुलीला वेगळ्या नजरेने पाहायचा. मुलीला मॅसेज करायचा, पीडित मुलीगीदेखील वडीलधारी व्यक्ती असल्याने त्याच्या मॅसेजला उत्तर द्यायची. मात्र, अनिल वडगामा हा अश्लील मॅसेज करत होता. पीडित अल्पवयीन मुलीने अनिलला असे मॅसेज करू नका असे बजावून सांगितलं. यावर आई आणि वडिलांच्या व्यवसायात पैशांची मदत करणार नाही, असं म्हणत अप्रत्यक्षपणे पीडितेला धमकावले. नाइलाजाने ती अनिलच्या मॅसेजला उत्तर द्यायची.
एकेदिवशी मुंबईत व्यवसायानिमित्त भेटीदरम्यान अनिलने पीडितेची आई वॉशरूमला जाताच तिचे चुंबन घेतले. यामुळे ती अधिकच मानसिक तणावात आणि घाबरलेल्या अवस्थेत होती. आई – वडिलांच्या व्यवसायात व्यत्यय नको म्हणून ती मानसिक त्रास सहन करत होती. अनिल हा पीडित १७ वर्षीय मुलीला मनासारखे न वागल्यास अश्लील भाषा वापरत शिवीगाळ करायचा. अखेर या सर्व घटनेला कंटाळून तिने याबाबतची माहिती आई आणि वडिलांना दिली. या प्रकरणी पूर्व मुंबई पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून एरॉन रिसॉर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर आरोपी अनिल वडगामाला अटक करण्यात आली आहे. ही घटना डिसेंबर २०२२ ते १५ डिसेंबर २०२३ दरम्यान घडली.