हॉटेल मध्ये फुकट जेवण न दिल्याने राडा; तिघांवर गुन्हा दाखल

0
319

चिखली,दि.२३(पीसीबी) – हॉटेल मध्ये फुकट जेवण न दिल्याने तिघांनी हॉटेल मध्ये तोडफोड करत हॉटेल चालक आणि कामगारांना मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 21) अंगणवाडी चौकाजवळ मोरेवस्ती चिखली येथे घडली.

मोहन बाळू भोसले (वय 23, रा. चिखली), सोन्या उर्फ अशोक शंकर राठोड (वय 19, रा. चिखली), हिंग्या आबासाहेब कोळेकर (वय 23, रा. महाळुंगे, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्वर इरप्पा हेळवे (वय 29, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहन भोसले आणि फिर्यादी यांची तोंडओळख आहे. मोहन आणि हिंग्या हा फिर्यादी यांच्या हॉटेल मध्ये आला. त्यावेळी फिर्यादी हॉटेल मध्ये नव्हते. त्याने फिर्यादीस फोन करून, ‘मी तुझ्या हॉटेलवर आलो आहे. जेवण दे नाहीतर तुझे हॉटेल फोडतो. कामगारांना मारतो. तुझे हॉटेल बंद कर’ अशी धमकी दिली. हॉटेलच्या किचनमधून उलथने घेऊन कामगारांना मारण्याची धमकी देत हॉटेलमधील ग्लास, ताटे, टेबल, खुर्च्या फोडून नुकसान केले.

काही वेळाने फिर्यादी यांचा भाऊ हॉटेलमध्ये असताना आरोपी मोहन आणि सोन्या हॉटेलमध्ये आले. त्यांनी लॉलीपॉप मागितला. त्यांना लॉलीपॉप दिला नाही म्हणून त्यांनी फिर्यादी यांच्या भावाला शिवीगाळ करून हॉटेलमध्ये तोडफोड केली. फिर्यादी यांच्या भावाला दांडक्याने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.