हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास नकार, मनसेकडून चोप; आता हॉटेल चालक परिपत्रकात म्हणतो…

0
265

मुंबई,दि.२५(पीसीबी) – वाशी येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या हॉटेलमध्ये इव्हेंट ऑर्गनायझरसह कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मराठी गाणे वाजवण्याची विनंती केली. मात्र, हॉटेल कर्मचाऱ्यासह चालकाने मराठी गाणी वाजविण्यास नकार दिला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती कळताच त्यांनी तिथं पोहोचून हॉटेल चालकास चोप दिल्याची घटना घडली आहे. यानंतर ‘टेस्ट ऑफ पंजाब’ या हॉटेल चालकाने परिपत्रक काढत दिलगिरी व्यक्त केली.

एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वाशी येथील ‘टेस्ट ऑफ पंजाब’ हॉटेलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सुरुवातीला अनेक हिंदी गाणी वाजविण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी एका हॉटेल कर्मचाऱ्याला मराठी गाणे वाजविण्यास सांगितले. मात्र, हॉटेल कर्मचाऱ्याने हॉटेलमध्ये मराठी गाणे वाजवण्यास बंदी असल्याचे सांगितले. त्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेल चालकाला मराठी गाणी वाजविण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी देखील मराठी गाणे वाजविण्याची अनुमती दिली नाही. त्यानंतर या प्रकाराची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांना मिळाली. माहिती मिळताच मनसे पदाधिकारी हॉटेलमध्ये पोहोचले. या मनसे पदाधिकाऱ्यांनी थेट हॉटेल चालकास चोप दिला. झालेल्या प्रकारावर हॉटेल संचालकांनी परिपत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली आहे.

या प्रकरणावर मनसे प्रवक्ते गजानन काळे म्हणाले, ‘द ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये एका कंपनीच ‘गेट टु गेदर’ सुरु होतं. मराठी गाणं लावण्यासाठी कंपनीचे कर्मचारी आग्रही होते. मँनेजर आणि डीजेने त्यांना नकार दिला. मनसेकडे तक्रार केल्यानंतर मनसैनिक गेले. पहिल्यांदा हात जोडून नंतर हात सोडून भाषा सांगितल्यावर मराठी गाणं लावण्यात आलं. मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांचं कौतुक आहे’.