खेड, दि. १५ (पीसीबी) -हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये होम थिएटर सरकवल्याच्या रागातून तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये पाच जणांनी मिळून दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच डोक्यात काचेच्या बाटल्या फोडून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 13) सायंकाळी खेड तालुक्यातील निघोजे गावातील हॉटेल स्काय मध्ये घडली.
प्रसाद रामचंद्र येळवंडे (वय 24, रा. निघोजे, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेखर तुपे, नितीन फलके (दोघे रा. महाळुंगे, ता. खेड) दोन अनोळखी व्यक्ती आणि एक अनोळखी महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद आणि त्यांचा मित्र निघोजे गावातील हॉटेल स्काय येथे जेवण करण्यासाठी गेले होते. फिर्यादी प्रसाद हे ज्या टेबल जवळ बसले होते तिथे हॉटेलमधील होम थिएटर ठेवण्यात आले होते. ते होम थिएटर त्यांनी बाजूला सरकावले. त्याचा राग शेजारील टेबलवर बसलेल्या आरोपींना आला. त्यावरून आरोपींनी प्रसाद आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ केली. शिवीगाळ करण्यास मज्जाव केला असता आरोपींनी प्रसाद यांच्या डोक्यात काचेच्या बाटल्या मारून खुर्च्यांनी पाठीवर हातावर डोक्यावर मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. तसेच आरोपी महिलेने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.












































