हॉटेलमध्ये जेवणाची वाट पहात होते, तोच दोघांनी गोळीबार करत त्याला संपवले

0
321

इंदापूर, दि. १७ (पीसीबी) -पुणे शहरातील कोयता गँग आणि गँगवारचे प्रकरण आता जिल्ह्यात पसरु लागले आहे. पुणे जिल्ह्यात खुनाची एक खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एखाद्या चित्रपटापेक्षाही जास्त थरारक हे सीसीटीव्ही फुटेज आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्यवळणावर असणाऱ्या हॉटेलमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. या घटनेत अविनाश बाळू धनवे (रा. आळंदी) याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्यवळणावर हॉटेल जगदंबा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी जेवण करण्यासाठी अविनाश धनवे यांच्यासह चार युवक बसले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर ते जेवण येण्याची वाट पाहू लागले. त्यांच्या गप्पाही रंगल्या होत्या. परंतु पुढे काय घडणार आहे, त्याची चौघांना कल्पना नव्हती. हे चौघे जण जेवणासाठी बसलेले असताना दोन युवक हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी थैलीत आणलेली पिस्तूल काढले आणि चौघांपैकी अविनाशवर गोळीबार सुरु केला. त्यानंतर आणखी काय युवक आले. त्यांनी अविनाशवर कोयत्याने वार सुरु केले. त्यानंतर काही सेंकदात सर्व जण हत्या करुन फरार झाले. यावेळी अविनाशसोबत असणारे तिघे प्रचंड घाबरले. त्यांनी पळ काढला. ही सर्व घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.

अविनाश धनवे गुन्हेगार
शनिवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान या हल्लाची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर हॉटेलमध्ये मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान अविनाश धनवे हा गुन्हेगार आहे. यामुळे गुन्हेगारी वादातून ही हत्या झाली असण्याची शक्यता आहे.

अविनाश धनवे हा आळंदीमधील कोयता गॅंगचा म्होरक्या होता. गेली पंधरा वर्षापासून तो गुन्हेगारी क्षेत्रात होता. त्याच्यावर आळंदी आणि भोसरी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहे. तो येरवडा कारागृहात असताना त्या ठिकाणी त्याची काही कैद्यांसोबत हाणामारी झाली होती.