हॉटेलचे बिल वैयक्तिक खात्यावर घेत हॉटेल मालकाची आठ लाखांची फसवणूक

0
194

हिंजवडी, दि. ३० (पीसीबी) – हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांचे बिल वैयक्तिक बँक खात्यावर घेऊन ते पैसे हॉटेल मालकाला न देता आठ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी चार कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 21 मे आणि त्यापूर्वी एक वर्षापासून हिंजवडी मधील हिल्टन गार्डन इन येथे घडला.

रमेश मधुकर पिंपळे (वय 62, रा. बालेवाडी) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बुद्धभूषण गंगाधर गजभारे (वय 30, रा. मारुंजी), कार्तिक पांडे, करण बाबुराव नाईक (वय 22, रा. हिंजवडी) आणि एका तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये आरोपींना कामावर ठेवले होते. हॉटेलच्या फ्रंट ऑफिस विभागात काम करत असताना आरोपींनी मागील एक वर्षापासून हॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्यांच्या चेक आउटच्या वेळेला त्यांचे पेमेंट वैयक्तिक बँक खात्यावर घेतले. हॉटेलचे कार्ड स्वॅप करण्याचे मशीन नादुरुस्त असल्याचे कारण त्यांच्याकडून सांगितले जात होते. मागील वर्षभरात आरोपींनी तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.