दि.०८(पीसीबी)-पल पल दिल के पास तुम रहते हो.. किशोर कुमारच्या जादुई आवाजातील हे गाण होम थिएटरवर सुरू झाले, आणि अजितदादांच्या आठवणींचा गहिवर डोळ्यांतून बांध फुटावा तसा फुटला.एक महिना उलटून गेला. कारण ते जेव्हा घडलं तेव्हा बारामती एअरपोर्टवर त्यांना रिसिव्ह करायला मी गेलो होतो.दादांचे विमान आले. लँड होते आहे असे वाटत असताना पुन्हा ते माघारी गेले. पुन्हा काही वेळाने आले आणि कोसळले. तो आघात काळजावर झाला आहे. दुःखाची कधीही न भरून येणारी भळभळणारी जखम गाठीशी बांधली गेली आहे.
त्यानंतर दादांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे कर्तव्य समजून गेली महिनाभर धावाधाव सुरू आहे. कोणी काही म्हणेल मात्र, काही गोष्टींना पर्याय नसतो. अजितदादा यांचे नाव चिरंतन राखण्यासाठी आणि त्यांचे काम पुढे नेण्यासाठी कामच करावे लागणार. त्यात कसूर होणार नाही.त्या सर्व धावपळीतून आज माझ्या कुटुंबासोबत थोडासा निवांत वेळ मिळाला. पत्नी पण म्हणाली, खूप दगदग झालीय तुमची. तब्येतीकडे लक्ष नाही. आज विश्रांती घ्या. तिने चहाचा कप हाती दिला. किशोर कुमारचे पल पल दिलके पास लागले आणि चहाच्या कपातून अलगद उमटणाऱ्या वाफांचे धुके जणू डोळ्यांत साचले. डोळ्यांतून पाण्याच्या धारा सुरू झाल्या.
दादांना किशोर कुमारची गाणी आवडतात म्हणून संग्रामनेच दादांना असाच एक पेन ड्राइव्ह दिला होता.आम्ही गाडीत बसलो की दादा मनवेना म्हणायचे, तो संग्रामने दिलेला पेन ड्राइव्ह लाव. त्यात मग हे गाणे लागले की दादा अगदी चुटकी वाजवून किशोरच्या आवाजात स्वतःचा आवाज मिसळायचे. तेच गाणं आज सकाळी कानी पडलं आणि डोळे वाहू लागले.दादांसोबत काम करतानाच्या अनेक आठवणींनी पुन्हा एकदा मनात फेर धरला. आता फक्त आठवणीच उरल्या या जाणिवेने भडभडून आलं.
तसा मी खूप वास्तववादी आहे. पण, दादा आता नाहीत या वास्तवाला सामोरे जाणे अजून शक्य होत नाही. एकटा राहिलो तर ही अशी अवस्था होणार, हे जाणून आहे. त्यामुळे स्वतःला कामाला जुंपून घेतले आहे. आज पत्नीच्या आग्रहास्तव निवांत बसून राहिलो आणि जे वाटले होते तेच घडले.दादा केवळ एका गाण्याने नाही तर अशा असंख्य कारणांनी आठवणीत आहेत.
आयुष्यातील एक फार मोठा काळ माझे आयुष्य हे अजितदादा या व्यक्तीने व्यापले होते. माझे अस्तित्व, माझी ओळख, माझे असणे, जगणे या साऱ्याचे कारण अजितदादा होते. महाराष्ट्रभर गावोगावी स्नेह संबंधाचे असंख्य धागे विणले गेले त्याचे कारण दादा होते.त्या धाग्यातून विणल्या गेलेल्या रेशीमशेल्याने आयुष्य उबदार झालं. ते तेव्हा जाणवले नाही आता मात्र दादांच्या नसण्याने ती जाणीव होतीय. तेव्हा ते जाणवण्याचे कारण पण नव्हते. कारण दादांशिवाय आयुष्य हा विचार देखील मनाला कधी शिवला नाही.
काळ कोणासाठी थांबत नाही हे सत्यच. मात्र, आमच्या आयुष्याला ब्रेक लागल्यासारखे झाले आहे. पण थांबून चालणार नाही. दिदी, पार्थदादा, जयदादा यांच्यासाठी त्यांच्यासोबत जिद्दीने पुढे पाऊल टाकावे लागणार आहे.ही जिद्द बळकट करण्यासाठी अशा निवांतपणाला आता आयुष्यात थारा नाही. त्या निर्धाराने डोळे पुसले आहेत. मोठ्या कष्टाने अश्रू रोखण्याचा प्रयत्न केला आहे. काळीज मात्र आक्रंदत आहे.
ग्रेस यांच्या कवितेतील चार ओळी पाठ सोडत नाहीत. त्या ओळी आहेत,
स्तोत्रांत इंद्रिये अवघी,
गुणगुणती दुःख कुणाचे?
हे सरता संपत नाही,
चांदणे तुझ्या स्मरणांचे.
सुनीलकुमार मुसळे.










































