हे बघा आणि तुम्हीच ठरवा, EVM ची कमाल…

0
57

मुंबई, दि. 26 (पीसीबी) : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतील घवघवीत यश मिळालं असून तब्बल महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 237 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकांचा हा निकाल अनेकांना आश्चर्यचकीत करणार असून भाजपमधील अनेक पदाधिकारी व नेत्यांनीही बहुमत अपेक्षित होतं, पण एवढं अपेक्षित नव्हतं, असं म्हटलंय. त्यामुळे, या निकालावर अनेक बाजुंनी शंका उपस्थित केल्या जात आहेत. शिवसेना युबीटी नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी थेट हा निकाल आम्हाला मान्य नसल्याचं म्हटलंय. तर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेला मान्य आहे का, असा सवाल करत ईव्हीएमवर (EVM) संशय व्यक्त केला आहे. आता, पराभूत आमदारांच्या बैठकांमध्ये देखील निकालावरुन नाराजी व संशयाचा सुर उमटत असल्याचे पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वटि करुन हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, अशा आशयाची पोस्ट करत 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमधील संख्याबळात सर्वात कमी संख्याबळ असलेला पक्ष ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत केवळ 10 जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 70 पेक्षा जास्त आमदारांचा पराभव झाल्याने ही बाब चिंताजनक असल्याचं पक्षाला वाटत आहे. त्यातूनच आज सर्वच पराभूत आमदारांची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये, बहुतांश आमदारांनी ईव्हीएममवर संशय घेत निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या पराभूत आमदारांच्या बैठकीत सर्वच उमेदवारांनी निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याची भूमिका मांडली. यावेळी, आमदारांनी बैठकीत ईव्हीएमबाबत रोष व्यक्त केला, महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवारानी भूमिका घ्यावी अशी देखील विनंती या आमदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, आता शरद पवार नेमकं काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.

दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड स्वत: एक लाखांच्या मताधिक्याने निवडून आले असले तरी त्यांनी देखील ईव्हीएम बाबत रोष व्यक्त केला आहे. त्यातचून, त्यांनी नाशिक जिल्ह्यातील विजयी आमदारांच्या नावांची आणि त्यांना मिळालेल्या मतांची यादीच ट्विटरवरुन शेअर केली आहे. तसेच, हे बघा आणि तुम्हीच ठरवा, EVM ची कमाल अशा आशयाचे ट्विट करत ईव्हीएमच्या निकालावर थेट संशय व्यक्त केला आहे.

नाशिक
जिल्ह्यातील 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी आणि सारखेपण
सुहास कांदे 138068
माणिकराव कोकाटे 138565
नरहरी झिरवाळ 138622
छगन भुजबळ 135023
———-
हिरामण खोसकर 117575
नितीन पवार 119191
दिलीप बनकर 120253
———–
राहुल ढिकले 156246
दादा भुसे 158284
दिलीप बोरसे 159681
———-
देवयानी फरांदे 105689
डॉ.राहुल आहेर 104826