हेमंत रासनेंनी केला अचारसंहितेचा भंग; निवडणूक निर्णय अधिकारी करणार कारवाई ?

0
235

पुणे , दि २६ (पीसीबी) – कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानास सुरवात झाली. कसब्यात भाजपचे हेमंत रासने विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर अशी दुहेरी लढत आहे. तर चिंचवड मतदारसंघाचा आघाडीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होत आहे.

कसब्याचे भाजपे उमेदवार हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. मतदान करताना थेट मतदान केंद्रात पक्षचिन्ह असलेला रुमाल वापरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ते सध्या अडचणीत आले आहेत. हेमंत रासनेंनी आचारसंहिता शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी कारवाई करणार का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाच्या जवळ भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्यांचे प्रदर्शन करण्यास मनाई असते असे करणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन समजले जाते. हेमंत रासने थेट मतदान कक्षात पक्षाची ओळख असलेला रुमाल गळ्यात घालून गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता आयोग त्यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदाराला मतदान दिवसाच्या आधी मतदार पावती पाठवली जाते. या मतदार पावतीमध्ये मतदाराचे मतदान केंद्र, ओळखपत्र क्रमांक तसेच खोली क्रमांक आदी तपशील असतो. मात्र कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी मतदारसंघातील काही भागात मतदार पावती मतदारांपर्यंत पोहोचलीच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक मतदारांनी आपले नाव मतदान यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी गर्दी केल्याचे आढळून आले. तर काही ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्याने मतदारांना मतदान करता आले नाही.