हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा..

0
2

पाच लाख पुरणपोळ्या, चार हजार लीटर दूध, दोन लाख मांडे.. सोहळ्याची भव्यता ऐतिहासिक

पिंपरी, दि.१५ : हजारोंच्या संख्येने उपस्थित भाविक, रोज हजारोंच्या संख्येत गाथा पाराण, हजारोंचा तुकाराम जप, हजारो भाविकांना प्रसाद, हा प्रसाद करणारे हजारो हात.. अशा भव्य वातावरणात पार पडणारा जगद्गुरू तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सदेह वैकुंठ गमन सोहळ्याची इतिहासात निश्चितच नोंद राहील.
या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने सांप्रदायात लोकांमध्ये भक्तिची भावना वाढीस लागली पाहिजे. असे सोहळे दरवर्षी झाले पाहिजेत. त्यानिमित्ताने लोकांच्या हातून दान केले जात आहे. कुठेतरी आपण समाजाचे, संतांचे देणे लागतो, याचे उतराई होण्याचा प्रयत्न लोकांनी केला पाहिजे. संप्रदायाविषयीची लोकांची भावना दृढ होत असते. हा सोहळा आयोजित करण्यात आला म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर नामजप करण्यात आला आणि तो यशस्वी झाला. १५ हजार लोक पारायण करण्यासाठी बसले होते.
संत तुकाराम महाराज जिथे गाथा लिहिण्यासाठी बसले होते, तिथेच सध्या पारायण सुरू आहे. हा योग क्वचित येत असतो. पुन्हा पुन्हा हे सगळे अनुभवता येणार नाही. त्या माध्यमातून समाजाची आणि संतांची सेवा घडावी, अशी इच्छा व्यक्त होत आहे. तुकाराम बीजेच्या दिवशी ७० ते ८० हजार लोक श्रवणासाठी उपस्थित असतील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.

पुरणपोळ्यांसाठी उत्तरप्रदेशातून तूप
श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सुरू असलेल्या सोहळ्यामध्ये होळी पौर्णिमेनिमित्त मुळशी तालुक्यातून पाच लाख पुरणपोळ्या आल्या होत्या. तालुक्यातील गावांमध्ये घरोघरी महिलांनी पुरणपोळ्या तयार केल्या आणि त्या भंडारा डोंगरावर प्रसादासाठी पाठविण्यात आल्या. या प्रसादासाठी पुरणपोळीबरोबर चार हजार लीटर दूध आले होते. पुणे जिल्हा आणि आसपासच्या तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू असतानाच उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथून ३७५ किलो तूपाचे डबे आले होते. आमदार शंकरभाऊ जगताप यांचे बंधू विजूशेठ जगताप यांच्या सहकार्याने हे तूप आणण्यात आले.

बीजेच्या दिवशी तीन लाख मांडे भोजन
उद्या बीजेच्या दिवशी मांडे भोजन होणार आहे. धुळे तालुका वारकरी सेवा मंडळ, समस्त साक्री तालुका वारकरी सेवा मंडळ, समस्त मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड, पारोळा या तालुक्यांमधून म्हणजे पुण्यापासून ५५० ते ६०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वेगवेगळ्या तालुक्यांमधून २ लाख मांडे भोजन पाठविले जात आहे. शनिवारी (१५ मार्च) संध्याकाळी या गाड्या श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे दोन लाख मांडे घेऊन येतील. या तालुक्यांमधील घरोघरी मांडे तयार केले जाणार आहेत.

एकूणच सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात शिधा देण्यात आला आहे. गावागावातून शिधा दिला गेला आहे. एखाद्या गावाने ३७५ तेलाचे डबे दिले आहेत. हा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळा असल्यामुळे ३७६ या आकड्याचे महत्त्व राखून तशाप्रकारे दान दिले जात आहे. ज्याला जितके जमेल तसा शिधा लोक देत आहेत. काही जणांनी ५०, १०० तेलाचे डबे दिले आहेत.

मोठ्या प्रमाणावर इंद्रायणी तांदूळ दान
मावळात जिथे शेतकरी भाताचे पीक घेतात त्या शेतकऱ्यांनी तांदूळ प्रचंड मोठ्या प्रमाणावर दान केला आहे. आत्ता सुरू असलेल्या भव्य सप्ताहासारखे आणखी चार सप्ताह होतील, इतक्या मोठ्या प्रमाणात इंद्रायणी तांदूळ या सोहळ्यासाठी शेतकऱ्यांनी पाठविला आहे.

काल्याच्या कीर्तनाने १७ तारखेला सोहळा संपेल.
हभप ज्ञानेश्वर महाराज कदम अर्थात छोटे माऊली यांच्या शब्दाखातर समाज मोठ्या प्रमाणावर एकत्र आला आहे. त्यांच्या शब्दाखातर नऊ तालुके एकत्र येऊन हा सोहळा यशस्वी होण्यासाठी हातभार लागला आहे. त्यांचे हे कार्य खूप मोठे केले आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छोटे माऊली यांचा मनपत्र देऊन गौरव करावा अशी इच्छा पुणे जिल्ह्यातील सेवेकरींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे १७ तारखेला हे मानपत्र प्रदान केले जाईल, अशी चर्चा आहे.

सोहळ्याची वैशिष्ट्ये

  • सोहळ्याच्या परिसरात २४ तास तुकाराम नावाचा जप सुरू आहे.
  • त्यासाठी स्वतंत्र मंडप व्यवस्था करण्यात आली आहे.
  • १२० गावांचे वीणेकरी २४ तास पहारा देत असतात आणि अखंड नामजप सुरू असतो.
  • गाथा पारायणात १५ हजार जणांचा सहभाग आहे.
  • रोज ५०० टाळकरी, १२ वीणेकरी सोहळ्यात उपस्थित असतात.
  • बीजेच्या दिवशी ७० ते ८० हजार भाविक कीर्तनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे