“…ही बाळासाहेब ठाकरेंची खानदान होऊ शकत नाही”; रामदास कदम यांचा ठाकरेंवर घणाघात

0
72

मुंबई, दि. ३० (पीसीबी) : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. तर दुसरीकडे अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. येत्या विधानसभेत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा संघर्ष रंगणार आहे. त्यातच आता महायुतीतील शिंदे गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्घव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “आपल्याच आमदाराला संपवणारा जगातील पहिला नेता म्हणजे उद्धव ठाकरे” असे विधान शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केले आहे.

शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी नुकतंच खेडमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “शिवसेना आम्ही मोठी केली. कालचं पिल्लू याला काय माहिती”, असा टोला रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

“आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याला एका कवडीची पण किंमत देत नाही. आदित्य ठाकरे यांचं योगदान काय आहे. शिवसेना आम्ही मोठी केली. कोकणी माणसाने शिवसेना मोठी केली. कालच पिल्लू याला काय माहिती”, अशा शब्दात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.

“आदित्य ठाकरे बेईमान आहेत. ही बाळासाहेब ठाकरे यांची खानदान होऊ शकत नाही. राजकारणातून आमचं खानदान उद्धवस्त करण्याचे काम उद्धव ठाकरे करत होते. आपल्याच आमदाराला संपवणारा जगातील पहिला नेता म्हणजे उद्धव ठाकरे. जर त्यांच्यात हिंमत असेल तर आदित्य काय त्याच्या बापाने उद्धवने दापोलीतून उभे राहून दाखवावे”, असे चॅलेंजही रामदास कदम यांनी दिले.

“नारायण राणे जेव्हा पक्षातून बाहेर पडले. तेव्हा हाच उद्धव ठाकरे मला पुढच्या सीटवर बसवल्याशिवाय मातोश्रीवरुन बाहेर पडत नव्हता. ज्या सापाला दूध पाजलं तो अंगावर येतोय, त्याचा फणा कसा ठेचायचा हे मला चांगलं माहिती आहे. तुम्ही कुणाच्या अंगावर येताय याचं भान ठेवा”, असेही रामदास कदम यांनी म्हटले.