महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मधील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या बैठकीत प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. उमेश गणेश काटे, श्रीम. शीतल विठ्ठल काटे, श्रीम. मीनाक्षी अनिल काटे आणि श्री. विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे यांच्या प्रचारार्थ नागरिकांशी सुसंवाद साधला.
आज शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढली आहे. त्यानुसार रस्ते रुंद व प्रशस्त करणं, सभागृहांची उभारणी, मूलभूत सुविधा मजबूत करणं या बाबी काळाची गरज आहेत. उमेदवारी देताना काही नवे तर काही अनुभवी चेहरे देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
यापूर्वीच्या काळात आदरणीय पवार साहेबांनी IT पार्कसारखे दूरदृष्टीचे निर्णय घेतले. हे शहर म्हणजे मिनी भारत आहे. पण आज शहराला दूरदृष्टी असलेलं नेतृत्व कमी पडत असल्याचं चित्र दिसत आहे. AI, आधुनिक तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रातील नव्या संधी यांचा योग्य वापर होणं गरजेचं आहे.
आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचारामुळे पोखरली गेली आहे. नको त्या लोकांच्या हातात सूत्र गेली आणि त्यामुळे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेचं मोठं नुकसान झालं. ७० टक्क्यांहून अधिक CCTV कॅमेरे बंद आहेत, प्रदूषण वाढत आहे, झाडं जळत आहेत, याचे गंभीर परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत. यंदाची ही निवडणूक व्यक्तीची नाही, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भवितव्याची निवडणूक आहे.
बदल हवा असेल तर संधी द्यावी लागते. मला सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आणि विश्वास मला हवा आहे. मी कुठेही कमी पडणार नाही, याची खात्री देतो. येत्या, १५ जानेवारीला मतांच्या रूपानं नागरिकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, असं आवाहन आहे.








































