दि . २५ ( पीसीबी ) – संपूर्ण देशाला हादरवणारा, काश्मीरचं खोरं पुन्हा रक्तरंजित करणारा आणि 26 निष्पाप लोकांचा बळी घेणार पहलगाममधील दहशतवादी हल्ला. सगळ्यानांच मुळापासून हादरवणाऱ्या या घटेनेने देशभरात फक्त शोकाचं नव्हे तर संतापाचं वातावरण आहे. जगभरातील अनेक देशांनी, त्यांच्या राष्ट्रप्रमुखांनीही या नृशंस हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त करत दहशतवादाविरोधातील लढाईकत आपण भारतासोहबत असल्याची ग्वाही दिली. या हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्या, पाकिस्तानला धडा शिकवा, मोठी कारवाई करा अशी मागणी या हल्ल्यानतंर सर्व स्तरातून होत आहे. या नृशंस हल्ल्यानंतर भारतानेही कठोर भूमिका घेत पाकिस्तानची कोंडी करत त्यांचं कंबरडं मोडण्यासाठी महत्वाची पावलं उचलली आहेत.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यावर भारताची भूमिका यासंदर्भात भाष्य केलं आहे. जेव्हा आपल्यात परस्पर मतभेद असतात, तेव्हा समाजातील दरी वाढते. जेव्हा आपण एकतेच्या तत्वाचे पालन करतो तेव्हा आपुलकीची भावना वाढते. जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात, असं मोहन भागवत म्हणाले. काल मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 83 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदू हाच मानवता धर्म असल्याचं ते यावेळी म्हणाले.
पहलगाम हल्ल्यातील निष्पापांचा बळी गेल्यामुळे सगळ्यांच्याच मनात दु:ख आहे. जगात एकच धर्म असून तो मानवता असल्याचं ते म्हणाले. ‘ जगात एकच धर्म आहे तो म्हणजे मानवता धर्म.. आजकाल त्यालाच हिंदू धर्म असं म्हणतात’ मोहन भागवतांच्या या विधानानंतर सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात बुडून गेलं. ” आपल्या जवानांनी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधील कुणाला धर्म विचारून मारलं नाही, पण काल ज्या कट्टरपंथियांनी उत्पात घडवला, हिंदू असं कधीही करणार नाहीत. पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथीय असं करतील.म्हणूनच आपला देश बलवान पाहिजे ” असं मोहन भागवत म्हणाले.
“धर्म आणि अधर्म यांच्यात लढाई आहे. काल त्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारून मारले. पण हिंदू कधीच असे करणार नाही. आपल्या हृदयात दुःख आहे, अंत:करण जड आहे. पण आमच्या मनात क्रोधही आहे आणि तो असलाही पाहिजे. कारण असुराचं निर्दालन जर व्हायचं असेल तर तर अष्टादशभुजांची शक्ती असलीच पाहिजे.” असे ते पुढे म्हणाले.
चांगलेपणा दुरूस्त करायचे सृष्टीचे जे मार्ग आहेत, त्यात एक मार्ग असा समजवून घेण्याचा असतो. जे अनुभव येतात, त्यातून मनुष्य शिकतो, सुधारतो स्वत:ला. पण काही लोकं असे असतात जे सुधरतच नाही, कारण त्यांनी जे शरीर, मन , बुध्दी धारण केली त्यात परिवर्तन शक्य नाही. रावण हा शिवभक्त होता, वेदशास्त्रसंपन्न होता, एक चांगला माणूस बनायला जे हवं ते सगळं होतं त्याच्याकडे. परंतु त्याने जे शरीर, मन, बुद्धी धारण केली , ती बदलायला तो तयार नव्हता. दुसरा कोणताही उपाय नव्हता. रावण जोपर्यंत हा देह सोडत नाही, आणि दुसरा जन्म घेत नाही तोपर्यंत तो सुधारणार नाही. रावण सुधारला पाहिजे, म्हणून रामाने त्याचा वध केला.” असे मोहन भागवत म्हणाले.
डॉ. मोहन भागवत पुढे म्हणाले, ” दुष्ट माणसांचं निर्दालन झालं पाहिजे, सध्या मनात राग आहे आणि अपेक्षाही आहेत. आणि यावेळी अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतं मला. जेव्हा आपला समाज एकजूट होईल, तेव्हा कोणीही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. जर कोणी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्याचे डोळे फुटतील.” असा इशारा त्यांनी दिला. ” द्वेष आणि शत्रुत्व आपल्या स्वभावात नाही, पण मार खाणं देखील आपल्या स्वभावात नाही. शक्तिशाली व्यक्तीने अहिंसक असले पाहिजे. शक्तीहीनांना त्याची गरज नसते. आणि जर शक्ती असेल तर ती अशा वेळी दिसली पाहिजे” असं मोहन भागवत यांनी नमूद केलं.