‘ही गर्दी ‘रस्त्यावर’ का उतरत नाही’एक भाबडा प्रश्न

0
66
  • दि ६ जुलै (पीसीबी ) – मधुकर भावे जगात एकूण १९५ देश आहेत. त्यातील अवघ्या २० देशांची ‘टी-२० क्रिकेट स्पर्धा’ अमेरिका आणि वेस्टइंडीज मध्ये संयुक्तपणे झाली. त्याला आपण ‘विश्वकप’ म्हणतो. त्याचा अर्थ क्रिकेटचे ‘विश्व’ जेमतेम २० देशांपुरते आहे. त्यातील अमेरिकेसह दहा देश असे आहेत की, ते ‘हौसे, गवसे, नवसे’ आहेत.. राहिले १०. त्यातील अव्वल ८. त्यातील अंतिम सामन्यासाठी दोन. त्यामध्ये भारत जिंकतो. आणि तो विजय सारा करण्याकरिता खेळाडूंच्या स्वागताला ८ लाख लोक जमतात… या गर्दीचे कौतुकही झाले. या गर्दीत चेंगराचेंगरी झाली नाही, याचा आनंदही व्यक्त झाला. पोलीस यंत्रणेने दक्षता घेतल्याने पोलिसांचेही कौतुकही झाले. आणि ते योग्यही आहे. कारण राजकारण असो… क्रिकेट असो… फोडाफोडी असो… सर्व ठिकाणी ताण शेवटी पोलिसांवरच आहे. त्यांच्या श्रमाला तोड नाही. आणि त्याची दखलही कोणी घेत नाही.
    एवढ्या प्रचंड संख्येने खेळाडूंच्या स्वागताला गर्दी करणारे, याच गर्दीच्या मुलभूत प्रश्नासाठी रस्त्यावर का उतरत नाहीत? असा प्रश्नही उपस्थित केला गेला. स्वागत जेवढे स्वाभाविक आहे त्याहीपेक्षा हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. पण ज्यांना समूहाचे शास्त्र माहिती आहे, त्यांना या गर्दीचे विशेष काही वाटणार नाही. ही जी गर्दी आहे ती विजय झाला म्हणून आहे. शिवाय आता प्रत्येक विषयाला ‘उत्सवाचे स्वरूप’ (इव्हेंट) आणण्याची नवीन भूमिका सत्ताधारी प्रभावीपणे वठवतात. त्याला लोक साथ देतात. छोटी गोष्ट ही ‘मोठी’ करून कशी सांगायची…. त्याची जाहिरात कशी करायची… अगदी लाडक्या बहिणाबाईला १५०० रुपये महिना देतानाही, १५ कोटी वाटल्यासारखी जाहिरात होते. आणि ते फॉर्म मिळवण्यासाठी महिलांच्या रांगा लागतात. प्रत्येक गोष्टीत जाहिरातबाजी आहे. त्याला ‘इव्हेंट’चे स्वरूप दिले जाते. आणि गर्दीचे मानसशास्त्र असे आहे की, ‘त्या गर्दीत मी आहे…’ हे दाखवण्याची स्पर्धाही खूप असते. क्रिकेट समजणारे आणि न समजणारे…. सगळेच त्यात असतात. खेळाडूंच्या मिरवणुकीसाठी गुजरातमधून आणलेल्या बसमध्ये आशिष शेलार यांचे काय काम? ते बॅट्समन आहेत…. बॉलर आहेत…. फिल्डर आहेत… ते कोण आहेत? माजी खेळाडू आहेत का? क्रिकेट संस्थेमधील एक पदाधिकारी. पण, त्यांनाही मिरवण्याची हौस आहे. जर पदाधिकाऱ्यांनाही मिरवण्याची हौस आहे तर, सामान्य माणसाला ती असणारच. त्यामुळे अशा प्रसंगात गर्दी होते. शिवाय दिवस बदललेले आहेत. जाहिरातबाजीचे आहेत. १९७१ साली याच भारतीय संघाने पहिल्या प्रथम इंग्लंडला पराभूत केले. त्यावेळी अजित वाडेकर यांच्या टीमचे आगमन झाले तेव्हा त्यावेळच्या सांताक्रूझ विमानतळावर गर्दी जमली होती. पण, त्यात उन्माद नव्हता. त्या विजयानंतर लगेच पुढच्या दौऱ्यात भारतीय संघ पाचही कसोटी सामन्यांत पराभव पत्करून आला. विजय मिळाल्यानंतर वाडेकर यांच्या नावाने इंदूमध्ये उत्साही लोकांनी प्रतिकात्मकरित्या बॅट उभी केली. पुढचे सामने हरल्यावर त्याच इंदूरच्या लोकांनी ती बॅट तोडून टाकली. (भारताबाहेरील कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा पहिला विजय १९६८ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली नोंदवला गेला आहे.) पण त्या विजयाची चर्चाही झाली नाही. स्वागत तर दूरच.
    गर्दीचे मानसशास्त्र समजून घेतल्यावर जमलेली गर्दी कालच्या विजयासाठी होती, हे समजू शकते. पण, ‘आपण जगज्जेते आहोत’ म्हणजे ते कायमचे आहोत, असा कोणत्याही खेळाचा अर्थ नसतो. दक्षिण आफ्रिकेच्या सोबत त्यादिवशी नशीब नव्हते. तो दिवस त्यांचा नव्हता. एवढाच आपल्या विजयाचा मर्यादित अर्थ आहे. डेव्हीड मिलरचा षटकार एक इंचाने कमी पडला.. नाहीतर….. १८ एप्रिल १९८६ रोजी शारजा येथे झालेल्या सामन्यात चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर जावेद मियँादादने षटकार ठोकून भारतीय संघाला पराभूत केलेच होते ना… तो दिवस त्या दिवशी पाकिस्तानचा होता… २९ जून हा दिवस दक्षिण आफ्रिकेचा नव्हता.त्यामुळे फार हुरळून जाण्याची गरज नाही. यश-अपयश हे खेळाचे भाग आहेत. हे समजून घेण्याची गर्दीची मानसिकता नसते. आणि म्हणून ही गर्दी झाली. या निमित्ताने दोन प्रश्न महत्त्वाचे उपस्थित केले गेले आहेत.
    ‘एवढी गर्दी करून रस्त्यावर उतरणारे हेच लोक जनतेच्या मुलभूत प्रश्नासाठी रस्त्यावर का उतरत नाहीत?’ हे प्रश्न वृत्तपत्रातील अग्रलेखातून विचारलेले आहेत. त्यासाठी मणिपूरचे उदाहरण दिलेले आहे. महिला कुस्तीपटू संघटनेत एका महिलेला फरफटत नेवून पोलिसांनी विटंबना केली. त्या विरोधात रस्त्यावर कोण उतरले का? पाठींबा देण्यासाठी खेळाबद्दल अस्था असलेलेसुद्धा का उतरले नाहीत? वाढती महागाई-बेरोजगारी असे जीवन-मरणाचे प्रश्न आज गळफासासारखे भेडसावत असताना, हेच लोक रस्त्यावर का उतरत नाहीत?’ या अशा प्रश्नांची उत्तरे गर्दीमध्ये मिळत नाहीत. गर्दी किती असली तरी त्या गर्दीतला प्रत्येकजण एकटा-एकटा आणि सुटा-सुटा असतो. अगदी चर्चगेट आणि सी.एस.टी. स्थानकांवरील संध्याकाळची गर्दीसुद्धा प्लॅटफॅार्मवर उभे रहायला जागा नसते. तिथंही प्रत्येकजण एकटा-एकटाच असतो. अशी गर्दी रस्त्यावर का उतरत नाही? याचे सरळ आणि सोपे कारण की, त्यासाठी लागणारे नेतृत्त्व समाजात असावे लागते. त्यासाठी त्या नेतृत्त्वावर विश्वास असणारे लोक असावे लागतात. नेतृत्त्व करणाऱ्यावर विश्वास असावा लागतो आणि नेत्याच्या मागे येणाऱ्या जनतेवरही नेत्याचा विश्वास असावा लागतो. शांततामय मार्गाने या महाराष्ट्रात किती प्रचंड आंदोलने झाली. याची अनेकांना आज आठवणही नसेल. किंबहुना ज्या संपादकांनी अग्रलेखातून हे प्रश्न विचारले त्यांनी अशी आंदोलने पाहिलीही नसतील. तो त्यांचा दोष नाही. पण, समुदायाचे आंदोलन नेत्याशिवाय होत नाही. आजचा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सगळ्यात मोठा दुष्काळ, समाजाचे नेतृत्त्व करणारे त्या विश्वासाचे आणि त्या ताकतीचे नेतेच नाहीत. त्या नेत्याचे नाव काय? ‘सत्ताधारी असलेला’ हा सत्तेचा प्रमुख असतो. त्याची सत्तेची कवच-कुंडले गळून पडल्यानंतर त्याच्या मागे िकती लोक आहेत, अशी असंख्य सत्ताधाऱ्यांची नावे सांगता येतील की, सत्ता गेल्यानंतर त्यांच्या मागे, समाज नाही… लोक नाहीत… त्यामुळे लोकांचे प्रश्न गेल्या ५० वर्षांत अधिक उग्र झाले असताना…. ५० वर्षांपूर्वीसारखी आंदोलने आता होत नाहीत, याचे मुख्य कारण त्या आंदोलनाला तो आवाका असलेला आणि लोकांचा विश्वास असलेला नेता राहिलेला नाही. त्या नेत्याला जे सामाजिक चारित्र्य लागते ते सामाजिक चारित्र्यही शिल्लक राहिलेले नाही. त्या योग्यतेची जाणीव असलेला नेता नाही आणि त्याला मानणारे अनुयायी नाहीत. ही अवस्था सर्वात वाईट अशी अवस्था असते. एक प्रकारची ती निर्णायकी असते. राजकीय परिभाषेत बोलायचे तर आज लोकांचे नेतृत्त्व करेल, असे शरद पवारांसारखे अपवादात्मक एखादा नेता आहे. पण दुसरे कोणते नाव आहे ?
    १८ एप्रिल १९८६ रोजी शारजा येथे झालेल्या अंतिम सामन्यात चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर जावेद मियँादादने षटकार ठोकून भारतीय संघाला पराभूत केलेच होते ना… तो दिवस त्या दिवशी पाकिस्तानचा होता… २९ जून २०२४ हा दिवस दक्षिण आफ्रिकेचा नव्हता.त्यामुळे फार हुरळून जाण्याची गरज नाही. यश-अपयश हे खेळाचे भाग आहेत. हे समजून घेण्याची गर्दीची मानसिकता नसते. आणि म्हणून ही गर्दी झाली. या निमित्ताने काही संपादकांनी महत्त्वाचे दोन प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. ते रास्त आहेत… पण… भाबडे आहेत.
    विषय काय होता… शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर अधारित भाव मिळाला पाहिजे. ५० वर्षे तोच विषय आहे…. अजून प्रश्न सुटलेला नाही. पण आता असा मोर्चा निघू शकत नाही. कारण आता उद्धवराव पाटील नाहीत… एन. डी. पाटील नाहीत… गणपतराव देशमुख नाहीत… मुंबईत जॉर्ज फर्नांडीस नाही…. तिकडे विदर्भात जांबुवंतराव धोटे नाहीत… लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याची ताकद असलेला नेता जेव्हा दिसतो तेव्हा लोक त्याच्या पाठी जातात. मणिपूरमध्ये एका भगिनीची विवस्त्र धिंड काढली गेली आणि आज लाडक्या बहिणीच्या १५०० रुपयांसाठी फॉर्म आणायला गर्दी करणाऱ्या त्याच रक्तामासाच्या महाराष्ट्रातील भगिनींना मणिपूरमधील स्त्रीच्या बदनामीविरोधात रस्त्यावर उतरावे, असे वाटले नाही. अक्रोश करण्यासाठी जी शक्ती लागते तीही कोणामध्ये नाही. याचे कारण आज मृणाल गोरे नाहीत…. अहिल्याताई रांगणेकर नाहीत… तारा रेड्डी अशा नेत्या नाहीत… नेता असल्याशिवाय लोक स्वत:हून रस्त्यावर उतरतील, अशी शक्यता फार कमी आहे. त्यामुळे समाज जेव्हा नेतृत्त्वहिन होतो त्यावेळी अदृश्य अराजकाची सुरुवात झालेली असते. जाहिरातबाजीतून नेतृत्त्व कधीही स्थापन होत नाही. हातात सोन्याची कडी आणि गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून, मोठ्या गाड्या घेवून फिरणारे आणि आपल्या वाढदिवसाला पान-पान जाहिराती देणारे ‘पुढारी’ बरेच आहेत… पण, ते ‘नेते’ नाहीत. ‘पुढारीपण’ स्वस्त झालेले आहे…. ‘नेतेपण’ सोपे नाही. त्या नेतेपणामागे त्याग, सेवा आणि समर्पण या कृतीची गरज आहे. समाजाप्रती मनात अस्था असल्याशिवाय आणि होणाऱ्या अन्यायाबद्दल संताप असल्याशिवाय असे आंदोलन शक्य नाही. लोक रस्त्यावर येणे शक्य नाही. नेतृत्त्व नसताना पंजाबमधील शेतकऱ्यांनी एक प्रचंड आंदोलन करून दाखवले. लोक जेव्हा आंदोलन हातात घेतात त्यावेळी ती ‘लोकचळवळ’ होते. आणि अशा चळवळीपुढे मोदी असोत…. शहा असोत… सत्तेने बेभान झालेल्या अशा सत्ताधाऱ्यांनाही गुडघे टेकायला लागतात. पण, त्याकरिता सामुदायिक मानसिकता तयार करण्याचे काम प्रश्नांची दाहकता करत असते. पंजाबमध्ये ती दाहकता निर्माण झाली आणि त्यामुळे आंदोलनातील प्रतेकजण नेता झाला. हे सामुदायिक नेतृत्त्व याचीसुद्धा आज वानवा आहे. महाराष्ट्रात आज सगळ्यात मोठा दुष्काळ या सामाजिक नेतृत्वाचाच आहे. राजकीय पुढारी आहेत. पण तरीही रस्त्यावर उतरून चळवळ करण्याएवढे क्षमता असलेले किती आहेत? चळवळ करण्याची शक्ती असलेले दोन घटक असतात. त्यात प्रामुख्याने शेतकरी आणि दुसरा कामगार.. तिसरी शक्ती आहे ती विद्यार्थ्यांची. पण, नीट परीक्षेचा एवढा गोंधळ होऊनसुद्धा, किती विद्यार्थी संघटना रस्त्यावर आल्या? महाराष्ट्रातील किंवा देशातील विद्यार्थ्यांचे नेतृत्त्व करील असा नेता कोण? यासाठी जे वातावरण लागते ते वातावरण आज पैशाने आणि स्वस्त झालेल्या लोकशाहीने बिघडवून टाकलेले आहे. ‘पैशाने मी काहीही करू शकतो,’ असा एक माज समाजात निर्माण झाला की, त्याची चटक लागते. आज महाराष्ट्राची अवस्था तीच झालेली आहे. ज्यांच्याजवळ पैसा आहे तो एवढा अफाट-बेफाट आहे की, ते म्हणेल ते करू शकतात. हवं ते बेकायदेशीर काम करून घेवू शकतात. यंत्रणेला सडवू शकतात. आणि सत्ताधारी नेत्यांना खिशात ठेवू शकतात. नाहीतर १००-१०० वर्षे ज्यांनी उद्योगात घालवली आणि उद्योग यशस्वी करून चारित्र्य टिकवले ते टाटा-बिर्ला यांना मागे टाकून बांडगुळासारखे उगवलेले अंबानी-अदानी आज देशात श्रीमंत व्हावेत, हे कोणाच्या जोरावर होऊ शकते? क्रिकेटचा आणि जयेश शहाचा काय संबंध? अशिष शेलार यांचा काय संबंध? पण, हा प्रश्न त्यांना कोण विचारू शकणार? हे सर्व कोणत्या शक्तीने होते? या शक्ती समाजाच्या आजच्या स्थितीला कारणीभूत आहेत. विवेकावर जेव्हा पैसा मात करतो त्यावेळी सामाजिक प्रश्नावर चळवळ उभी राहू शकत नाही. मग, मध्यमवर्गीयांची मानसिकता अशा ठिकाणी गर्दी करण्याची तयार होते. परवाच्या गर्दीचा तोच अर्थ आहे. त्यातील क्रिकेट समजणारे किती? हा भाग वेगळा. क्रिकेट या देशात लोकप्रिय आहे, यातही दुमत नाही. पण त्या क्रिकेटमध्ये पैसा शिरल्यामुळे इव्हेंट तयार झाला. ५० वर्षांपूर्वी बापू नाडकर्णी सांगायचा… ‘पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात ५० रुपये मिळायचे. रोजचे दहा रुपये याप्रमाणे… अगदी पंच असलेल्या माधव गोठस्कर यांनासुद्धा.’ कारण त्यावेळी पैशासाठी खेळ नव्हता. आनंदासाठी खेळ होता. आता सगळेच चित्र बदललेले आहे. जाहिराती आणि सामन्याची बक्षिसे यांची संख्या १०० कोटींच्या पुढे गेली. त्यामुळे तो ‘इव्हेंट’ होणारच. घरी होणाऱ्या सत्यनारायणाच्या पुजेची कोणी जाहिरात करत नाही. पण ताजमध्ये होणाऱ्या पार्टीची आमंत्रणे द्यावी लागतात. मानसिकतेमधील हा फरक आहे. त्यामुळे जमलेल्या गर्दीचे विश्लेषण करताना या गर्दीतील लोक रस्त्यावर उतरून त्यांच्याच प्रश्नासाठी चळवळीला तयार होतील, हा प्रश्न कितीही समयोचित वाटला तरी, भाबडा आहे. कारण, नेतृत्त्व असल्याशिवाय आंदोलन होत नाही आणि आज महाराष्ट्रापुरते बोलायचे तर जीवन-मरणाच्या प्रश्नावर लोकांना रस्त्यावर उतरवण्याची ताकद असलेला नेता नाही. प्रश्न आहेतच… आंदोलनाला रस्ते आहेत… लोकशाहीमध्ये आंदोलन आवश्यक आहे. पण, ते आंदोलन उभे करणारा नेता कोण?दि ६ जुलै (पीसीबी )मधुकर भावे जगात एकूण १९५ देश आहेत. त्यातील अवघ्या २० देशांची ‘टी-२० क्रिकेट स्पर्धा’ अमेरिका आणि वेस्टइंडीज मध्ये संयुक्तपणे झाली. त्याला आपण ‘विश्वकप’ म्हणतो. त्याचा अर्थ क्रिकेटचे ‘विश्व’ जेमतेम २० देशांपुरते आहे. त्यातील अमेरिकेसह दहा देश असे आहेत की, ते ‘हौसे, गवसे, नवसे’ आहेत.. राहिले १०. त्यातील अव्वल ८. त्यातील अंतिम सामन्यासाठी दोन. त्यामध्ये भारत जिंकतो. आणि तो विजय सारा करण्याकरिता खेळाडूंच्या स्वागताला ८ लाख लोक जमतात… या गर्दीचे कौतुकही झाले. या गर्दीत चेंगराचेंगरी झाली नाही, याचा आनंदही व्यक्त झाला. पोलीस यंत्रणेने दक्षता घेतल्याने पोलिसांचेही कौतुकही झाले. आणि ते योग्यही आहे. कारण राजकारण असो… क्रिकेट असो… फोडाफोडी असो… सर्व ठिकाणी ताण शेवटी पोलिसांवरच आहे. त्यांच्या श्रमाला तोड नाही. आणि त्याची दखलही कोणी घेत नाही.
    एवढ्या प्रचंड संख्येने खेळाडूंच्या स्वागताला गर्दी करणारे, याच गर्दीच्या मुलभूत प्रश्नासाठी रस्त्यावर का उतरत नाहीत? असा प्रश्नही उपस्थित केला गेला. स्वागत जेवढे स्वाभाविक आहे त्याहीपेक्षा हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. पण ज्यांना समूहाचे शास्त्र माहिती आहे, त्यांना या गर्दीचे विशेष काही वाटणार नाही. ही जी गर्दी आहे ती विजय झाला म्हणून आहे. शिवाय आता प्रत्येक विषयाला ‘उत्सवाचे स्वरूप’ (इव्हेंट) आणण्याची नवीन भूमिका सत्ताधारी प्रभावीपणे वठवतात. त्याला लोक साथ देतात. छोटी गोष्ट ही ‘मोठी’ करून कशी सांगायची…. त्याची जाहिरात कशी करायची… अगदी लाडक्या बहिणाबाईला १५०० रुपये महिना देतानाही, १५ कोटी वाटल्यासारखी जाहिरात होते. आणि ते फॉर्म मिळवण्यासाठी महिलांच्या रांगा लागतात. प्रत्येक गोष्टीत जाहिरातबाजी आहे. त्याला ‘इव्हेंट’चे स्वरूप दिले जाते. आणि गर्दीचे मानसशास्त्र असे आहे की, ‘त्या गर्दीत मी आहे…’ हे दाखवण्याची स्पर्धाही खूप असते. क्रिकेट समजणारे आणि न समजणारे…. सगळेच त्यात असतात. खेळाडूंच्या मिरवणुकीसाठी गुजरातमधून आणलेल्या बसमध्ये आशिष शेलार यांचे काय काम? ते बॅट्समन आहेत…. बॉलर आहेत…. फिल्डर आहेत… ते कोण आहेत? माजी खेळाडू आहेत का? क्रिकेट संस्थेमधील एक पदाधिकारी. पण, त्यांनाही मिरवण्याची हौस आहे. जर पदाधिकाऱ्यांनाही मिरवण्याची हौस आहे तर, सामान्य माणसाला ती असणारच. त्यामुळे अशा प्रसंगात गर्दी होते. शिवाय दिवस बदललेले आहेत. जाहिरातबाजीचे आहेत. १९७१ साली याच भारतीय संघाने पहिल्या प्रथम इंग्लंडला पराभूत केले. त्यावेळी अजित वाडेकर यांच्या टीमचे आगमन झाले तेव्हा त्यावेळच्या सांताक्रूझ विमानतळावर गर्दी जमली होती. पण, त्यात उन्माद नव्हता. त्या विजयानंतर लगेच पुढच्या दौऱ्यात भारतीय संघ पाचही कसोटी सामन्यांत पराभव पत्करून आला. विजय मिळाल्यानंतर वाडेकर यांच्या नावाने इंदूमध्ये उत्साही लोकांनी प्रतिकात्मकरित्या बॅट उभी केली. पुढचे सामने हरल्यावर त्याच इंदूरच्या लोकांनी ती बॅट तोडून टाकली. (भारताबाहेरील कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा पहिला विजय १९६८ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली नोंदवला गेला आहे.) पण त्या विजयाची चर्चाही झाली नाही. स्वागत तर दूरच.
    गर्दीचे मानसशास्त्र समजून घेतल्यावर जमलेली गर्दी कालच्या विजयासाठी होती, हे समजू शकते. पण, ‘आपण जगज्जेते आहोत’ म्हणजे ते कायमचे आहोत, असा कोणत्याही खेळाचा अर्थ नसतो. दक्षिण आफ्रिकेच्या सोबत त्यादिवशी नशीब नव्हते. तो दिवस त्यांचा नव्हता. एवढाच आपल्या विजयाचा मर्यादित अर्थ आहे. डेव्हीड मिलरचा षटकार एक इंचाने कमी पडला.. नाहीतर….. १८ एप्रिल १९८६ रोजी शारजा येथे झालेल्या सामन्यात चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर जावेद मियँादादने षटकार ठोकून भारतीय संघाला पराभूत केलेच होते ना… तो दिवस त्या दिवशी पाकिस्तानचा होता… २९ जून हा दिवस दक्षिण आफ्रिकेचा नव्हता.त्यामुळे फार हुरळून जाण्याची गरज नाही. यश-अपयश हे खेळाचे भाग आहेत. हे समजून घेण्याची गर्दीची मानसिकता नसते. आणि म्हणून ही गर्दी झाली. या निमित्ताने दोन प्रश्न महत्त्वाचे उपस्थित केले गेले आहेत.
    ‘एवढी गर्दी करून रस्त्यावर उतरणारे हेच लोक जनतेच्या मुलभूत प्रश्नासाठी रस्त्यावर का उतरत नाहीत?’ हे प्रश्न वृत्तपत्रातील अग्रलेखातून विचारलेले आहेत. त्यासाठी मणिपूरचे उदाहरण दिलेले आहे. महिला कुस्तीपटू संघटनेत एका महिलेला फरफटत नेवून पोलिसांनी विटंबना केली. त्या विरोधात रस्त्यावर कोण उतरले का? पाठींबा देण्यासाठी खेळाबद्दल अस्था असलेलेसुद्धा का उतरले नाहीत? वाढती महागाई-बेरोजगारी असे जीवन-मरणाचे प्रश्न आज गळफासासारखे भेडसावत असताना, हेच लोक रस्त्यावर का उतरत नाहीत?’ या अशा प्रश्नांची उत्तरे गर्दीमध्ये मिळत नाहीत. गर्दी किती असली तरी त्या गर्दीतला प्रत्येकजण एकटा-एकटा आणि सुटा-सुटा असतो. अगदी चर्चगेट आणि सी.एस.टी. स्थानकांवरील संध्याकाळची गर्दीसुद्धा प्लॅटफॅार्मवर उभे रहायला जागा नसते. तिथंही प्रत्येकजण एकटा-एकटाच असतो. अशी गर्दी रस्त्यावर का उतरत नाही? याचे सरळ आणि सोपे कारण की, त्यासाठी लागणारे नेतृत्त्व समाजात असावे लागते. त्यासाठी त्या नेतृत्त्वावर विश्वास असणारे लोक असावे लागतात. नेतृत्त्व करणाऱ्यावर विश्वास असावा लागतो आणि नेत्याच्या मागे येणाऱ्या जनतेवरही नेत्याचा विश्वास असावा लागतो. शांततामय मार्गाने या महाराष्ट्रात किती प्रचंड आंदोलने झाली. याची अनेकांना आज आठवणही नसेल. किंबहुना ज्या संपादकांनी अग्रलेखातून हे प्रश्न विचारले त्यांनी अशी आंदोलने पाहिलीही नसतील. तो त्यांचा दोष नाही. पण, समुदायाचे आंदोलन नेत्याशिवाय होत नाही. आजचा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सगळ्यात मोठा दुष्काळ, समाजाचे नेतृत्त्व करणारे त्या विश्वासाचे आणि त्या ताकतीचे नेतेच नाहीत. त्या नेत्याचे नाव काय? ‘सत्ताधारी असलेला’ हा सत्तेचा प्रमुख असतो. त्याची सत्तेची कवच-कुंडले गळून पडल्यानंतर त्याच्या मागे िकती लोक आहेत, अशी असंख्य सत्ताधाऱ्यांची नावे सांगता येतील की, सत्ता गेल्यानंतर त्यांच्या मागे, समाज नाही… लोक नाहीत… त्यामुळे लोकांचे प्रश्न गेल्या ५० वर्षांत अधिक उग्र झाले असताना…. ५० वर्षांपूर्वीसारखी आंदोलने आता होत नाहीत, याचे मुख्य कारण त्या आंदोलनाला तो आवाका असलेला आणि लोकांचा विश्वास असलेला नेता राहिलेला नाही. त्या नेत्याला जे सामाजिक चारित्र्य लागते ते सामाजिक चारित्र्यही शिल्लक राहिलेले नाही. त्या योग्यतेची जाणीव असलेला नेता नाही आणि त्याला मानणारे अनुयायी नाहीत. ही अवस्था सर्वात वाईट अशी अवस्था असते. एक प्रकारची ती निर्णायकी असते. राजकीय परिभाषेत बोलायचे तर आज लोकांचे नेतृत्त्व करेल, असे शरद पवारांसारखे अपवादात्मक एखादा नेता आहे. पण दुसरे कोणते नाव आहे ?
    १८ एप्रिल १९८६ रोजी शारजा येथे झालेल्या अंतिम सामन्यात चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर जावेद मियँादादने षटकार ठोकून भारतीय संघाला पराभूत केलेच होते ना… तो दिवस त्या दिवशी पाकिस्तानचा होता… २९ जून २०२४ हा दिवस दक्षिण आफ्रिकेचा नव्हता.त्यामुळे फार हुरळून जाण्याची गरज नाही. यश-अपयश हे खेळाचे भाग आहेत. हे समजून घेण्याची गर्दीची मानसिकता नसते. आणि म्हणून ही गर्दी झाली. या निमित्ताने काही संपादकांनी महत्त्वाचे दोन प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. ते रास्त आहेत… पण… भाबडे आहेत.
    विषय काय होता… शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर अधारित भाव मिळाला पाहिजे. ५० वर्षे तोच विषय आहे…. अजून प्रश्न सुटलेला नाही. पण आता असा मोर्चा निघू शकत नाही. कारण आता उद्धवराव पाटील नाहीत… एन. डी. पाटील नाहीत… गणपतराव देशमुख नाहीत… मुंबईत जॉर्ज फर्नांडीस नाही…. तिकडे विदर्भात जांबुवंतराव धोटे नाहीत… लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याची ताकद असलेला नेता जेव्हा दिसतो तेव्हा लोक त्याच्या पाठी जातात. मणिपूरमध्ये एका भगिनीची विवस्त्र धिंड काढली गेली आणि आज लाडक्या बहिणीच्या १५०० रुपयांसाठी फॉर्म आणायला गर्दी करणाऱ्या त्याच रक्तामासाच्या महाराष्ट्रातील भगिनींना मणिपूरमधील स्त्रीच्या बदनामीविरोधात रस्त्यावर उतरावे, असे वाटले नाही. अक्रोश करण्यासाठी जी शक्ती लागते तीही कोणामध्ये नाही. याचे कारण आज मृणाल गोरे नाहीत…. अहिल्याताई रांगणेकर नाहीत… तारा रेड्डी अशा नेत्या नाहीत… नेता असल्याशिवाय लोक स्वत:हून रस्त्यावर उतरतील, अशी शक्यता फार कमी आहे. त्यामुळे समाज जेव्हा नेतृत्त्वहिन होतो त्यावेळी अदृश्य अराजकाची सुरुवात झालेली असते. जाहिरातबाजीतून नेतृत्त्व कधीही स्थापन होत नाही. हातात सोन्याची कडी आणि गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून, मोठ्या गाड्या घेवून फिरणारे आणि आपल्या वाढदिवसाला पान-पान जाहिराती देणारे ‘पुढारी’ बरेच आहेत… पण, ते ‘नेते’ नाहीत. ‘पुढारीपण’ स्वस्त झालेले आहे…. ‘नेतेपण’ सोपे नाही. त्या नेतेपणामागे त्याग, सेवा आणि समर्पण या कृतीची गरज आहे. समाजाप्रती मनात अस्था असल्याशिवाय आणि होणाऱ्या अन्यायाबद्दल संताप असल्याशिवाय असे आंदोलन शक्य नाही. लोक रस्त्यावर येणे शक्य नाही. नेतृत्त्व नसताना पंजाबमधील शेतकऱ्यांनी एक प्रचंड आंदोलन करून दाखवले. लोक जेव्हा आंदोलन हातात घेतात त्यावेळी ती ‘लोकचळवळ’ होते. आणि अशा चळवळीपुढे मोदी असोत…. शहा असोत… सत्तेने बेभान झालेल्या अशा सत्ताधाऱ्यांनाही गुडघे टेकायला लागतात. पण, त्याकरिता सामुदायिक मानसिकता तयार करण्याचे काम प्रश्नांची दाहकता करत असते. पंजाबमध्ये ती दाहकता निर्माण झाली आणि त्यामुळे आंदोलनातील प्रतेकजण नेता झाला. हे सामुदायिक नेतृत्त्व याचीसुद्धा आज वानवा आहे. महाराष्ट्रात आज सगळ्यात मोठा दुष्काळ या सामाजिक नेतृत्वाचाच आहे. राजकीय पुढारी आहेत. पण तरीही रस्त्यावर उतरून चळवळ करण्याएवढे क्षमता असलेले किती आहेत? चळवळ करण्याची शक्ती असलेले दोन घटक असतात. त्यात प्रामुख्याने शेतकरी आणि दुसरा कामगार.. तिसरी शक्ती आहे ती विद्यार्थ्यांची. पण, नीट परीक्षेचा एवढा गोंधळ होऊनसुद्धा, किती विद्यार्थी संघटना रस्त्यावर आल्या? महाराष्ट्रातील किंवा देशातील विद्यार्थ्यांचे नेतृत्त्व करील असा नेता कोण? यासाठी जे वातावरण लागते ते वातावरण आज पैशाने आणि स्वस्त झालेल्या लोकशाहीने बिघडवून टाकलेले आहे. ‘पैशाने मी काहीही करू शकतो,’ असा एक माज समाजात निर्माण झाला की, त्याची चटक लागते. आज महाराष्ट्राची अवस्था तीच झालेली आहे. ज्यांच्याजवळ पैसा आहे तो एवढा अफाट-बेफाट आहे की, ते म्हणेल ते करू शकतात. हवं ते बेकायदेशीर काम करून घेवू शकतात. यंत्रणेला सडवू शकतात. आणि सत्ताधारी नेत्यांना खिशात ठेवू शकतात. नाहीतर १००-१०० वर्षे ज्यांनी उद्योगात घालवली आणि उद्योग यशस्वी करून चारित्र्य टिकवले ते टाटा-बिर्ला यांना मागे टाकून बांडगुळासारखे उगवलेले अंबानी-अदानी आज देशात श्रीमंत व्हावेत, हे कोणाच्या जोरावर होऊ शकते? क्रिकेटचा आणि जयेश शहाचा काय संबंध? अशिष शेलार यांचा काय संबंध? पण, हा प्रश्न त्यांना कोण विचारू शकणार? हे सर्व कोणत्या शक्तीने होते? या शक्ती समाजाच्या आजच्या स्थितीला कारणीभूत आहेत. विवेकावर जेव्हा पैसा मात करतो त्यावेळी सामाजिक प्रश्नावर चळवळ उभी राहू शकत नाही. मग, मध्यमवर्गीयांची मानसिकता अशा ठिकाणी गर्दी करण्याची तयार होते. परवाच्या गर्दीचा तोच अर्थ आहे. त्यातील क्रिकेट समजणारे किती? हा भाग वेगळा. क्रिकेट या देशात लोकप्रिय आहे, यातही दुमत नाही. पण त्या क्रिकेटमध्ये पैसा शिरल्यामुळे इव्हेंट तयार झाला. ५० वर्षांपूर्वी बापू नाडकर्णी सांगायचा… ‘पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात ५० रुपये मिळायचे. रोजचे दहा रुपये याप्रमाणे… अगदी पंच असलेल्या माधव गोठस्कर यांनासुद्धा.’ कारण त्यावेळी पैशासाठी खेळ नव्हता. आनंदासाठी खेळ होता. आता सगळेच चित्र बदललेले आहे. जाहिराती आणि सामन्याची बक्षिसे यांची संख्या १०० कोटींच्या पुढे गेली. त्यामुळे तो ‘इव्हेंट’ होणारच. घरी होणाऱ्या सत्यनारायणाच्या पुजेची कोणी जाहिरात करत नाही. पण ताजमध्ये होणाऱ्या पार्टीची आमंत्रणे द्यावी लागतात. मानसिकतेमधील हा फरक आहे. त्यामुळे जमलेल्या गर्दीचे विश्लेषण करताना या गर्दीतील लोक रस्त्यावर उतरून त्यांच्याच प्रश्नासाठी चळवळीला तयार होतील, हा प्रश्न कितीही समयोचित वाटला तरी, भाबडा आहे. कारण, नेतृत्त्व असल्याशिवाय आंदोलन होत नाही आणि आज महाराष्ट्रापुरते बोलायचे तर जीवन-मरणाच्या प्रश्नावर लोकांना रस्त्यावर उतरवण्याची ताकद असलेला नेता नाही. प्रश्न आहेतच… आंदोलनाला रस्ते आहेत… लोकशाहीमध्ये आंदोलन आवश्यक आहे. पण, ते आंदोलन उभे करणारा नेता कोण?

सध्या एवढेच 📞9869239977