‘हिट अँड रन’ प्रकरणात फडणवीस राजीनामा द्या – रोहित पवार

0
213

पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणाची राज्यातच नाहीतर देशात चर्चा होत आहे. जनतेने आवाज उठवल्यामुळे जामीनावर सोडलेल्या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

रोहित पवार काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’ गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत. रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाही. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

फेब्रुवारी महिन्यामध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक विनोद घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. घोसाळकर यांच्या घराजवळ राहणारा मॉरिस या व्यक्तीने फेसबुक लाईव्ह करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणावेळी विरोधकांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना, विरोधी पक्षाची अशी स्थिती आहे की एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते माझा राजीनामा मागतीस. ही मागणी राजकीय असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हटलं होते.