हिट अँड रनने पुन्हा महाराष्ट्र हादरला ! गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना BMW ने उडवले, एकाचा मृत्यू, एक गंभीर

0
96


मुंबई, दि. 08 (पीसीबी): गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषात मुंबईत गणरायाचा जल्लोष सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. मुंबईत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे मुलुंडचा राजा या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बॅनर लावण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना भरधाव बीएमडब्ल्यू कारने उडवलं. यात मुलुंडचा राजा मंडळाच्या एका कार्यकर्त्याचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. प्रीतम बिंदुसार थोरात असे या तरुणाचे नाव आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

मुलुंडमधील हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला. यावेळी एका बीएमडब्ल्यू कारने कँपस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असताना मुलुंडचा राजाच्या कार्यकर्त्यांना उडवलं. या अपघातात प्रीतम बिंदुसार थोरात या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर प्रसाद पाटील हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर कार चालक हा घटनास्थळावरुन पसार झाला. त्याने गाडी थेट मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगाने नेत घराजवळ ठेवली. त्यानंतर त्याने थेट नवी मुंबई गाठली.

शक्ती हरविंदर अलग असे या आरोपीचे नाव आहे. तो मुलुंडमधील रहिवासी असून कॉल सेंटरला काम करतो. ही कार शक्ती हरविंदर अलग याच्या मालकीची असून तो स्वत: गाडी चालवत होता. शक्तीने त्याची गाडी दुरुस्त केली होती. त्यामुळे ती व्यवस्थित काम करते की नाही हे पाहण्यासाठी तो टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला असताना हा अपघात घडला. या अपघातानंतर पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे. तसेच याप्रकरणातील मुख्य आरोपीला तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पोलिसांनी खारघर येथून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड पूर्वेला काल 7 सप्टेंबर पहाटे चारच्या दरम्यान मुलुंडचा राजा मंडळाचे दोन कार्यकर्ते एका शिडीवर चढून बॅनर लावण्याचे काम करत होते. यादरम्यान एक बीएमडब्ल्यू गाडी रस्त्यावरुन जात असताना त्याच्या गाडीचा धक्का शिडीला लागला. त्यामुळे ते दोघेही शिडीवरुन खाली कोसळले. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी वेगवगेळ्या टीम तयार केल्या. यानंतर सुरुवातीला पोलिसांनी गाडीचा शोध घेतला. काही वेळातच गाडीचा शोध लागल्यावर आम्ही आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला नवी मुंबईतून अटक केली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणात तपास नवगत पोलीस ठाण्यातून सुरु आहे. शक्ती हरविंदर अलग असे आरोपीचे नाव असून तो ३२ वर्षांचा आहे. सध्या त्याच्या वैद्यकीय चाचण्या सुरु आहेत. यात त्याने मद्यपान केले होते की नाही, याचा तपास केला जात आहे.