“हिंदू समाज संभ्रमावस्थेत!” – नरेंद्र पेंडसे

0
435

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) “सध्या हिंदू समाज संभ्रमावस्थेत असून तो आपले सत्त्व आणि स्वाभिमान विसरला असून छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगापासून त्याने प्रेरणा घ्यावी!” असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते नरेंद्र पेंडसे यांनी श्रीकेदारेश्वर मंदिर प्रांगण, पेठ क्रमांक २४, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक १२ जून २०२२ रोजी केले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (१२ जून २०२२) या तिथीनुसार छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या राज्याभिषेकाला तीनशे अठ्ठेचाळीस वर्षे पूर्ण झालीत, या प्रसंगाचे औचित्य साधून ‘हिंदू साम्राज्य दिन’ या विशेष कार्यक्रमात नरेंद्र पेंडसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. माजी नगरसेविका शर्मिला बाबर अध्यक्षस्थानी होत्या; तसेच भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप मोरे, सामाजिक कार्यकर्ते विजय शिनकर, भास्कर रिकामे, बाळा शिंदे आणि श्रीकेदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्याख्यानापूर्वी, विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक पोवाड्यांचे दमदार सादरीकरण केले. शिवपुतळ्याचे पूजन करून आणि “छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार!” या गीताचे सामुदायिक गायन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतातून शर्मिला बाबर यांनी, “इसवी सन १६७४च्या जून महिन्यात ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला छत्रपती शिवाजीमहाराजांनी राज्याभिषेक करवून जगाला हिंदवी स्वराज्याची ग्वाही दिली होती. त्या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मियांनी सर्व मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे!” असे मत व्यक्त केले. शिवराज्याभिषेकाचे अतिशय रोमहर्षक वर्णन करून नरेंद्र पेंडसे पुढे म्हणाले की, “पुणे आणि सुपे ही छोटीशी जहागिरी असलेल्या शहाजीराजे यांच्या सुपुत्राने म्हणजे शिवबांनी आपल्या मातेच्या प्रेरणेतून हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. स्वराज्याचा विस्तार करताना त्यांनी मुरारबाजीसारख्या अनेक हिंदू सरदार, राजे यांची मनोभूमिका बदलून त्यांना स्वराज्याशी जोडून घेतले.

कल्याण, भिवंडी येथील प्रांतातील पाडलेली मंदिरे पुन्हा उभारली; तर इस्लामी सत्तेच्या ताब्यातील मंदिरे मुक्त केलीत. जिंजी येथील मंदिर पाडून उभारलेल्या मशिदींचे मंदिरांमध्ये पुनर्निर्माण केले. कल्याणच्या मुस्लीम सुभेदाराच्या सुनेला साडीचोळीचा आहेर करून तिची सन्मानाने रवानगी करताना आपल्या निष्कलंक चारित्र्याचे प्रमाण इतिहासात अधोरेखित केले. आपली राजमुद्रा आणि अष्टप्रधान मंडळातील पदे संस्कृत भाषेतून उद्धृत केलीत. बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर यांचे इस्लाम धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात पुनर्वसन केले. हिंदुस्थानाच्या दुर्दैवाने छत्रपती शिवाजीमहाराज यांना दीर्घायुष्य लाभले नाही; पण त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे झेंडे मराठी सरदारांनी अटकेपार रोवले. पूर्वीच्या अखंड भारतातील अनेक प्रांत आणि धार्मिक स्थळे हिंदूंनी गमावलेली आहेत. हिंदू साम्राज्य दिन साजरा करताना ती मुक्त करण्यासाठी कटिबद्ध व्हावे!” सिंधुनगर मित्रमंडळ, विवेक मित्रमंडळ, नवनगर मित्रमंडळ, वरदविनायक मित्रमंडळ आणि ओम शिवतेज मित्रमंडळ यांनी संयोजनात सहकार्य केले. चंद्रकांत लिंगायत यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र बाबर यांनी आभार मानले.