हिंदूराष्ट्रासाठी घटनादुरुस्ती झाली तर त्यात काय वाईट आहे…

0
178

पुणे,दि.२१(पीसीबी) – बागेश्वार धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग आणि दरबार कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात बुधवारपर्यंत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पुण्यातील विविध पुरोगामी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. धीरेंद्र शास्त्री हे सत्संग आणि दरबारच्या माध्यमातून अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनात्मक तरतुदींविरोधी भाष्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी वक्तव्ये, कृती आणि दावे करत असतात, असा दावा अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केला आहे. अंनिसने याप्रकरणी कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी पुण्यात काल (२० नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन घटनादुरुस्तीची मागणी केली आहे.

हिंदूराष्ट्राच्या मागणीबाबत धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “आपल्या पूर्वजांनी संविधानाचा स्वीकार केला आहे. मीही संविधानाचा स्वीकार करतो. पण त्याच संविधानात आतापर्यंत १२५ वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. त्यामुळे आणखी एकदा हिंदूराष्ट्रासाठी घटनादुरुस्ती झाली तर त्यात काय वाईट आहे. पण सगळ्यात आधी आम्हाला लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन करायचं आहे. लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन झालं की मग संविधानातही हिंदूराष्ट्र होईल.”

हिंदूराष्ट्राची स्थापना झाल्यास देशातील मुस्लिमांनी आणि इतर धर्मियांनी कुठे जायचं? असा प्रश्न विचारला असता धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “त्यांना कुठे पळण्याची गरज नाही. रामराज्यात सर्व धर्माचे लोक राहत होते. रामराज्याच्या स्थापनेनंतर मुस्लीम किंवा ख्रिश्चनांना कुठेही पळून जाण्याची गरज नाही. हेच आम्हाला लोकांना समजावून सांगायचं आहे. रामराज्याचा अर्थ सामाजिक समरसता आहे. हिंदूराष्ट्र म्हणजे सगळ्यांमध्ये एकता… हिंदूराष्ट्र म्हणजे तुम्ही आमच्या प्रभू श्रीरामाच्या यात्रेवर दगड फेकायचा नाही.हिंदूराष्ट्र म्हणजे पालघरमध्ये संतांबरोबर जे घडलं ते तुम्ही पुन्हा करणार नाही. कुणालाही पळून जाण्याची आवश्यकता नाही. पण तुमच्या मनात काही पाप असेल, तुम्ही पालघर हत्याकांडातील मारेकरी असाल, तुम्ही राम यात्रेवर दगड फेकणारे असाल तर तुमची तिरडी बांधली जाईल.”