– हिंदू जनजागृती समितीची शासनास निवेदनाद्वारे मागणी
पुणे, दि. ३ (पीसीबी) – मागील काही वर्षांपासून गणेशोत्सवाच्या दरम्यान जलप्रदूषणाचे कारण पुढे करत वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यास विरोध केला जात आहे. जिल्हा प्रशासन,पालिका प्रशासन या सर्वांनी मिळून गणेशोत्सव काळात गणेश मूर्तीचे नदीपात्रात विसर्जन करू नयेत,त्या मूर्ती फिरत्या हौदात विसर्जित कराव्यात, मूर्तीदान करावे असे आवाहन केले आहे. वास्तविक घटनेने धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिला असून तो अबाधित रहायला हवा अशी शासनाची भूमिका असायला हवी परंतू इथे धर्म स्वातंत्र्यवरच घाला घालण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. हिंदूंना दिलेला घटनेचा अधिकार अबाधित रहावा आणि त्या प्रमाणे गणेशोत्सव साजरा करता यावा या उद्देशाने शासनाने केलेले आवाहन मागे घ्यावे आणि हिंदूंना श्रीगणेशाचे विसर्जन वाहत्या पाण्यात करता यावे या आशयाचे निवेदन 2 सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे येथील शासन,प्रशासन विभागास देण्यात आले.
गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी विसर्जन घाट बंद केल्या विषयीचे निवेदन पुणे म.न.पा आयुक्त यांना देण्यात आले त्यांच्यावतीने ते निवेदन खासगी सचिवांनी स्विकारले. तसेच पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदन उपचिटणीस शुभांगी गोंजारे यांनी स्विकारले. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद, पुणे यांना दिलेले निवेदन श्री.मिलिंद टोणपे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (ग्रामपंचायत) जि.प.पुणे यांनी स्विकारले.
महानगरपालिकेने ५ व्या ७ व्या आणि १० व्या दिवशी गणपती विसर्जन करण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडावे जेणेकरून हिंदूंना धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करता येईल या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी पुणे,आयुक्त, पुणे म.न.पा.,अधिक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ,पुणे,कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे आदींना देण्यात आले.
समितीचे श्री. पाटील आणि श्री. मनोहरलाल उणेचा यांनी निवेदन दिले. संबंधित कार्यालयाने निवेदने स्वीकारली असून मागण्यांचा विचार करू असे आश्वासन देण्यात आले आहे.