हिंदुत्ववादी मुद्यांना बगल; राष्ट्रीय स्वयंसवेक संघाकडून भाजपच्या नेत्यांची खरडपट्टी

0
29

मुंबई, दि. 07 (पीसीबी) : राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा आता कोणत्याही क्षणी होऊ शकते. निवडणुकांना अवघ्या महीना – दीड महिन्याचा कालावधी असून सर्व पक्ष जय्यत तयारीनिशी मैदानात उतरले आहे. महायुती असो किंवा मविआ, सर्वांनीच कंबर कसून तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेतेही विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखण्यात व्यस्त असून केंद्रीय नेत्यांचे महाराष्ट्रात वारंवार दौरे होत आहेत. मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह हे देखील मुंबई, कोल्पूर, नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी आगामी निवडणुकीची रणनिती कशी असेल, काय करावे लागेल, जागावाटप या सर्व मुद्यांवर चर्चा केली.

एकीकडे भाजपने जय्यत तयारी केलेली असतानाच पितृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याचे समजते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संघाकडून भाजपच्या नेत्यांची खरडपट्टी काढण्यात आली आहे. दक्षिण मुंबईमधील पदाधिकारी, नेत्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हिंदुत्ववादी मुद्यांना बगल दिल्याने संघ नाराज असल्याचे कळते. गिरगावमधील बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांकडून समज देण्यात आल्याची माहिती देखील मिळत आहे.

गिरगावमध्ये काल भाजप पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संघाच्या वरिष्ठ नेत्यांकडून दक्षिण मुंबईतील वरिष्ठ नेत्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आली. हिंदुत्वाच्या मुद्यांना बगल दिली जात असल्याचं संघाच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे. इतर धर्मीयांचे लांगूलचालन करू नका, हिंदुत्वाच्या मुद्यांना प्राधान्य द्या, असे सांगत संघाच्या नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना समज दिली.

दरम्यान राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ थेट प्रचारात उतरणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. संघाने थेट विधानसभा निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरण्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने संघाने भाजपला धारेवर धरले होते. महाराष्ट्रातील तसेच राज्यात पुरेसं यश न मिळाल्याची कारणमीमांसादेखील करण्यात आली होती.