जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा वारसा सांगणारे पिंपरी चिंचवडचे राजकारण आता गटारीत लोळतयं. कारणही तसेच आहे. भाजपाचे पिंपरी चिंचवड शहराचे आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या भोसरी विधानसभा मतदारसंघात तब्बल दहा ठिकाणी दणदणीत आखाड पार्टी आयोजिली आहे. सुमारे ७०-७५ हजार लोकांना चिकन, मटन, माशांचे साग्रसंगीत भोजन आहे. त्यासाठी २१०० किलो मटन, तितकेच चिकन, १२०० किलो मासे असा चार-पाच हजार किलो मांसमच्छी मागवली. दहा मंगलकार्यालये बूक केली. आमदारांच्या फोटोसह जोरदार जाहिरातबाजी केली. काही वर्तमानपत्रात त्यासंबंधी आलेली बातमीसुध्दा मोठी रंजक आहे. भाजपाची राज्यात सत्ता आल्याने यावेळी गतवर्षीपेक्षा मोठा जल्लोष असल्याचे या बातमीत म्हटले आहे. भाजपा आमदार अशा जंगी पार्ट्या देतात आणि शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सारखे षंढ बनलेले विरोधी पक्ष निव्वळ बघ्याची भूमिका घेतात. आपला देश, आपले राज्य, आपल्या शहराचे राजकारण कोणत्या दिशेने चाललेय त्याची ही एक झलक आहे. प्रश्न ३०-३५ लाख रुपये खर्चाचा किंवा उधळपट्टीचा नाही. मतदारांना अशा पध्दतीने दारू, मटनाच्या पार्ट्या देऊन विकत घेण्याची पूर्वी काँग्रेसची परंपरा होती. आता सर्वांपेक्षा वेगळे आणि स्वतःला रामाचा अवतार समजणाऱ्या सुसंस्कृत भाजपानेही तोच प्रघात अधिक जोमान सुरू ठेवलाय याचेच वाईट वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वेसर्वा मोहनजी भागवत किंवा तमाम हिंदू संस्कृतीरक्षकांची याला संमती आहे, असे समजायचे का ? राजकारणातील हाच संस्कार संघाला अपेक्षित आहे का ?तमाम युवा- युवतींच्या पुढे राजकारणाचे असे आदर्श तुम्ही ठेवणार आहात का ? सत्तेच्या राजकारणासाठी फोडाफोडी केली इतपत समजू शकते हो, पण आता संतांची शिकवण, ऋषीमुनींचा संस्कृती नासवायचा तुमचा अजेंडा आहे का ?
ज्या हिंदुत्ववादी भाजपाने हिंदू संस्कार, संस्कृतीचे जतन, संवर्धन करणे अपेक्षित आहे त्याच भाजपाच्या नेत्यांकडून, हे कृत्य व्हावे याचेच वैशम्य आहे. मतदार, कार्यकर्त्यांना खूश कऱण्यासाठी आखाड पार्टी हा पायंडाच मुळात घातक आहे. मोदींचा भाजपा तो मोडीत काढणार की दुप्पट ताकदीने राबविणार आहे. बहुसंख्य माध्यमांना जाहिरातींच्या पुरवण्यांचा तोबरा भरल्याने कोणीही या प्रकारा बद्दल तोंड उघडायला तयार नाही. भाजपाने आपल्या राजकीय स्वार्थासाठी एक एक यंत्रणा कशी गोठवून टाकली किंवा वेठीस धरली त्याचे असे अनेक दाखले देता येतील. राजकारण अशा गलिच्छ वळणावर येऊन ठेपले आहे. लोकांना वाटले सोवळे नेसलेला भाजपा साळसूद आहे म्हणून भरभरून मते दिली. महापालिकेत राष्ट्रवादीने प्रचंड भ्रष्टाचार केला म्हणून मतदारांनी भाजपाचा पर्याय निवडला. प्रत्यक्षात आता भाजपाचा खरा चेहरा आता दिसला. पालिकेत स्मार्ट सिटीत शेकडो कोटींची लूट करून नेते नामानिराळे झाले. महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी अडिच वर्षांत या भ्रष्टाचाराची साधी चौकशी लावायची हिंमत केली नाही. आता राज्यात पुन्हा सरकार आल्याने जणू सर्व गुन्हे माफ केल्याचे सर्टीफिकेट मिळाल्यासारखे भाजपाचे लोक सुसाट सुटलेत. आखाड पार्टी हा त्याचाच एक नमुना आहे. भ्रष्टाचारात जी लूट केली त्याचेच पापक्षालन करण्यासाठी मतदारांना लाच देण्याचा हा प्रकार आहे. वृत्तसंस्थांमध्ये आलेल्या बातमी खाली वाचकांनी दिलेल्या तिखट प्रतिक्रीया खूप बोलक्या आहेत. तमाम वाचकांनी लाखोल्या वाहिल्यात त्या आमदार महेश लांडगे यांना नाहीत तर भाजपाला आहेत. मुळात राजकारणातील आखाड संस्कृती भाजपाला मंजूर आहे, हाच सज्जनांसाठी मोठा धक्का आहे.
पिंपरी चिंचवड शहर हे देहू- आळंदी या तिर्थक्षेच्या सहवासात उभे राहिले. भोसरी, चिखली, चऱ्होली, मोशी, चिंचवड, वाकड, थेरगाव, आकुर्डीतील प्रत्येक घरात माळकरी, टाळकरी आहेत. एकादशी आणि पंढरपूरची वारी घराघरात आहे. भागवत धर्म आणि वारकऱ्यांचा तोच संस्कार, तोच वसा या शहराने कायम चालवला. अत्यंत प्रामाणिक, शालिन, विनम्र आणि प्रसंगी नाठाळाच्या माथी काठी घालणारी ही मंडळी. गावकी, भावकीतील आपुलकी आजही टिकून आहे कारण संतांची शिकवण, संस्कार. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवतातून मिळालेली तीच शिदोरी या शहराचा खरा ठेवा आहे. किर्तन सोहळा, प्रवचन, पारायणाचे शेकडो कार्यक्रम इथे होतात. कोणाची दशक्रीया, वर्षश्राध्द असो वा वाढदिवसाला पाच-पन्नास हजार रुपये खर्च करून महाराजांचे किर्तन ठेवण्याचा संस्कार या शहरावर आहे. आता जंगी मटन पार्टीचा संस्कार भाजपाकडून होतोय. कष्टकऱ्यांना देशोधडीला लावायचा हा प्रकार आहे, तो थांबल पाहिजे.
शहरात ४० कोटी रुपये खर्च करुन संतपीठ उभे केले, कारण या शहरात वारकरी निर्माण व्हावेत. संतपीठसुध्दा खासगी इंग्रजी शाळा चालकाकडे सोपविले. तिथेही भागीदारीत दुकान थाटले. राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडी प्रमुखांना विठ्ठल-रुक्मिनी मूर्ती भेट देण्यासाठी मोठी खरेदी केली होती. जिथे १५०० रुपयेंची मूर्ती जवळपास तिप्पट दराने म्हणजे ३९०० रुपयेंना खरेदी केली म्हणून लोक संतापले. पैसे खाताना देवसुध्दा सोडला नाही म्हणून अवघ्या २५-३० लाखाच्या खरेदीतील भ्रष्टाचाराचे प्रायश्चित म्हणून महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जनतेने घालवली. आता तर भाजपाने संत, तंत, पंत सगळेच घाऊकमध्ये विकायला काढले. आता आखाड पार्टीत इथे हिंदूंचा धर्म बुडाला असे संघ किंवा भाजपा म्हणणार आहेत का, ते पहायचे. महापालिकेचे घोडे मैदान समोर आहे.