हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला पुन्हा विलंब जाणून घ्या कधी सुरु होणार मेट्रो!

0
2

दि.१६(पीसीबी)-पुणेकरांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ प्रकल्पाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. मार्च अखेरपर्यंत ही मेट्रो सेवा सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तांत्रिक कामे आणि आवश्यक परवानग्या प्रलंबित असल्यामुळे प्रकल्पाला पुन्हा विलंब झाला आहे.प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही मेट्रो सेवा आता जुलै महिन्यात सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरात काम करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांना मेट्रोसाठी अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुमारे २३.५ किलोमीटर लांबीचा असून या मार्गावर एकूण २३ स्थानके असणार आहेत. काही स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी अजूनही १० ते १२ स्थानकांचे काम पूर्ण व्हायचे आहे, त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी थोडा कालावधी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

या मेट्रो मार्गावर एम्बेसी क्वाड्रोन बिझनेस पार्क, इन्फोसिस फेज-२, विप्रो फेज-२, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर, बाणेर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ॲग्रिकल्चर कॉलेज आणि शिवाजीनगर यांसारखी महत्त्वाची ठिकाणे जोडली जाणार आहेत.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल, तसेच आयटी कर्मचारी आणि नागरिकांना जलद व सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे