दि.४ऑगस्ट (पीसीबी) हिंजवडी,
हॉटेलमध्ये आलेल्या एका ग्राहकाने पिस्तलातून गोळीबार केला. ही घटना म्हाळुंगे येथील हॉटेल इमेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये शनिवारी (दि. 3) पहाटे एक वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी दत्ता तानाजी अर्जुन (वय 28, रा. पडाळे निवास, म्हाळुंगे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाळासाहेब व्यंकटराव दराडे (वय 41, रा. यशवीन सोसायटी, सुसगाव, ता. मुळशी, जि. पुणे) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे म्हाळुंगे येथे हॉटेल इमेज फॅमिली रेस्टॉरंट नावाचे हॉटेल आहे. हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री आरोपी ग्राहक आला. शनिवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास आरोपी दराडे याने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील फॅमिली ए.सी. रुममध्ये भिंतीवर गोळीबार केला.
हॉटेलमधील इतर ग्राहक व स्फाट यांचा जीव जावू शकतो याची जाणीव असतानाही आरोपीने गोळीबार केला. गोळीबार करण्याचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी आरोपी ग्राहकाला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.












































