वाकड, दि. २८(पीसीबी)- वाकड येथे हॉटेल स्पाईस फॅक्टरी आणि कस्तुरी चौकाजवळ असलेल्या हॉटेल सी डॉक या दोन हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये 49 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाया सोमवारी (दि. 26) रात्री करण्यात आल्या.
हॉटेल स्पाईस फॅक्टरीचा मालक स्वप्नील डांगे (रा. पारखेवस्ती, वाकड) आणि तानाजी सयाजी देसाई (वय 28, रा. पारखे वस्ती, वाकड. मूळ रा. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाकड येथे हॉटेल स्पाईस फॅक्टरी मध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत लोखंडी बार्बेक्यू इलेक्ट्रिक शेगडी, कोळसा, हुक्का साहित्य असा एकूण 15 हजार 800 रुपयांचा ऐवज जप्त केला.
दुसरी कारवाई कस्तुरी चौकाजवळ असलेल्या हॉटेल सी डॉक मध्ये करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अंमलदार चंद्रकांत गडदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर दिलीप काटे (वय 38, रा. पिंपळे सौदागर), अक्षय प्रभाकर कलाटे (वय 28, रा. विनोदेवस्ती, वाकड), दिनेश सुरेश काटे (रा. पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या हॉटेल सी डॉक मध्ये हुक्का पार्लर चालवण्याचा कोणताही परवाना न घेता ग्राहकांना हुक्का पुरवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 33 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.