हिंजवडी परिसरात चौघांची दहशत आणि महिलेचा विनयभंग

0
332

हिंजवडी, दि. २२ (पीसीबी) – रस्त्यात टेम्पो उभा करून स्पीकर लावल्याने त्यांना रस्त्यातून बाजूला होण्यास सांगणाऱ्या महिलेला चौघांनी धमकी दिली. मी मुळशीचा, कोयता गॅंगचा असून पोलिसही आम्हाला काही करू शकत नाहीत. असे म्हणत त्यांनी दहशत निर्माण केली. महिलेच्या अंगावर गाडी घालून तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. हा प्रकार १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाडकर चौक, हिंजवडी येथे घडला.

तुषार कोकरे, नितीन कोकरे आणि दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पुण्याहून हिंजवडीकडे चौकीवरून जात होत्या. वाडकर चौकात एक टेम्पो रस्त्यात उभा होता. खोदकाम सुरु होते आणि स्पीकरही जोरात सुरु असल्याने महिलेने स्पीकर बंद करून टेम्पो बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून तुषार आणि नितीन यांनी महिलेला शिवीगाळ केली. मी कोथरूडचा आहे. कोयता गॅंगचा आहे. पोलीस आम्हाला काहीही करू शकणार नाहीत, असा दम दिला.

त्यानंतर फिर्यादी महिलेने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलीस येईपर्यंत फिर्यादी घटनास्थळी थांबल्या होत्या. त्यांच्या पती आणि शेजारील व्यक्तीला घडलेला प्रकार सांगत असताना नितीन कोकरे दुचाकीवरून आला. त्याने दुचाकी थेट फिर्यादींच्या अंगावर घातली. फिर्यादींसोबत गैरवर्तन करून त्यांना अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केला. मी मुळशीचा आहे. मी सात ते आठ वेळा जेलमध्ये गेलो असून माझं कोणी काहीही करू शकत नाही. तुला जीवे मारून टाकतो, अशी त्याने फिर्यादीस धमकी दिली. यात फिर्यादी जखमी झाल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.