चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी करताना अजित पवार यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याचे सूतोवाच केले. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार या चर्चेला उधाण आलं आहे.
पुणे, दि. ७ (पीसीबी) – पुण्यासह पिंपरी चिंचवड शहराता वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड, आयटी पार्क, चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अॅक्शन मोडवर आले आहेत. दरम्यान आज भल्या पहाटे चाकण परिसरात उपस्थिती लावत कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याचे सूतोवाच केले.
पुणे जिल्ह्यात नव्यानं तीन महापालिका कराव्या लागणार असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे, मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका आणि चाकण भागात एक आणि हिंजवडी भागात एक महापालिका करावी लागणार आहे. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
कुणाला आवडो किंवा न आवडो पण नजीकच्या काळात चाकण आणि या सर्व परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे, आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत जसे की रस्ता अंडरग्राउंड ड्रेनेज, अशा अनेक बाबी असतात, यामध्ये बँकांचे वर्ल्ड बँकचे पैसे आणता येतात, केंद्र सरकारचा निधी आणता येतो, या प्रकारे आपल्याला करावे लागेल.
आपल्या जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड त्यानंतर वाकवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी या सर्व भागांमध्ये एक महानगरपालिका करावी लागेल, फुरसुंगी, उरुळी देवाची, तो सर्व परिसर एक महानगरपालिका नदी ओलांडून इकडे आलो पिंपरी चिंचवड मधनं तर बाकीच्या भागांमध्ये एक महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि जो सर्व वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल.
साधारण महानगरपालिका करण्याच्या करता पाच लाख लोकसंख्या असली की महानगरपालिका करता येते, तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे. या सगळ्या भागातील लोकसंख्या किती आहे. चाकणचा प्लॅन देखील आलेला आहे. मी म्हटलं तुम्ही मंजुरी घ्या, मी एकनाथ शिंदे यांची मदत घेतो, असेही पुढे अजित पवार यांनी म्हटले आहे.