हा थैलीशाही आणि मुजोर राजकारणाचा पराभव

0
4

– सामनाच्या अग्रलेखातून सिनेट परिक्षेच्या निकालावर भाष्य

मुंबई, दि. ३० (पीसीबी) : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक निकाल लागला. यात शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली. 10 पैकी 10 जागांवर शिवसेना ठाकरे गटाने विजय मिळवला. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सिनेट परिक्षेच्या निकालावर भाष्य करण्यात आलं आहे. भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. ‘सिनेट विजयाचा दणका!’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. ही मतं पैशांनी विकत घेता आली नाहीत. हा थैलीशाही आणि मुजोर राजकारणाचा पराभव आहे. ही तर परिवर्तनाची चाहूल आहे, असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

सामना अग्रलेख जसाच्या तसा
तरुणांचा आवाज म्हणून विद्यापीठांच्या ‘सिनेट’कडे पाहिले जाते. फी, परीक्षा, अभ्यासक्रम यावर तेथे चर्चा घडतात व निर्णय होतात. पदवीधरांचा आवाज हा लाखो तरुणांचा आवाज आहे. तरुणांच्या हाती देशाचे भवितव्य आहे . त्या पदवीधरांच्या सिनेट निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत हे धोरण पराभवाच्या भयातून आले होते . मात्र मुंबई विद्यापीठात पदवीधरांनी भाजपच्या थैलीशाही व मुजोर राजकारणाचा पराभव केला . ही परिवर्तनाची चाहूल आहे.

आता दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीतदेखील ‘भाजप’ ताकदीने उतरला आहे व या निवडणुकीचे नियंत्रण स्वतः पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा करीत आहेत. दिल्ली विद्यापीठातील निवडणुकांत कोटय़वधी रुपये खर्च होत आहेत. हा आकडा शंभर कोटींवर पोहोचला, पण इतका खर्च करूनही दिल्ली विद्यापीठावर भाजपचा झेंडा फडकेल अशी चिन्हे नाहीत.

दिल्लीतीलच जवाहरलाल नेहरू म्हणजे ‘जेएनयू’त डाव्यांची पकड आहे व भाजपने जंग जंग पछाडूनही त्यांना डाव्यांच्या पकडीतून ‘जेएनयू’ घेता आले नाही. आता मुंबई विद्यापीठातही भाजपचा पराभव झाला. पराभवाच्या भीतीने निवडणुकाच घ्यायच्या नाहीत हे धोरण या मंडळींनी मुंबई विद्यापीठातही राबवले. मागील दोन वर्षे ही सिनेटची निवडणूक या ना त्या कारणाने रखडवून ठेवली. मतदार याद्या रद्द केल्या.

अर्थात, शिवसेनेच्या युवा ब्रिगेडच्या शिस्तबद्ध यंत्रणेने तरीही हार मानली नाही व संघर्ष सुरूच ठेवला. मुंबई हायकोर्टाने दणका दिला तेव्हा कोठे निवडणुका घ्याव्या लागल्या आणि निवडणूक लांबविणाऱ्यांचे दात निकालाने त्यांच्याच घशात घातले. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरील शिवसेनेचा विजय शतप्रतिशत आहे. 10 पैकी 9 उमेदवारांनी कोटा तोडून भरघोस मते मिळवली. शिवसेनेच्या शेवटच्या उमेदवाराने 865 मते घेतली आणि भाजपच्या सर्व उमेदवारांची मिळून फक्त 706 मते भरली. मुंबईतील पदवीधरांत भाजपची ही पत आहे. ही मते पैशांनी विकत घेता आली नाहीत.