हा तर शरद पवार यांचा पॉवर गेम – आमदार संजय शिरसाठ

0
434

छत्रपती संभाजीनगर, दि. ५ (पीसीबी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यावर संपूर्ण राज्यसह देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा मान्य नसल्याची भूमिका घेत शरद पवार यांनी अध्यक्षपदी राहावे अशी मागणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी अध्यक्ष निवड समिती नेमली होती तीने निर्णय घ्यावा असा अध्यक्ष पदाचा चेंडू पवारांनी राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या कोर्टात टोलावला होता. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या असून अध्यक्ष निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनीच राहावे असा ठराव केला आहे. याच संपूर्ण घडामोडीवर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांना डिवचलं आहे.

आमदार संजय शिरसाठ म्हणाले, शरद पवार यांचा हा पावर गेम आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत कलह होता, त्यामुळे शरद पवार यांनी हा मास्टरस्ट्रोक दिला आहे. आता राष्ट्रवादीला नाविलाजास्तव एकत्र यावं लागणार आहे. शरद पवार यांनी हे स्पष्ट केलं आहे की, माझी ताकत म्हणजे माझी ताकत आहे. शरद पवार काहीही उलथापालथ करू शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

मी जर निर्णय घेतला तर कुणालाही अडचण होऊ शकते हे शरद पवार यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. अजित पवार यांच्या चलबिचलपनाला ब्रेक बसला आहे. आता शांत बसणे हा एकमेव पर्याय आहे, राष्ट्रवादीतली चलबिचल आता शांत होईल. अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या मनस्थितीत नाहीत, त्यांना महाराष्ट्राची धुरा स्वतःकडे घ्यायची आहे.

अजित पवार जेव्हा बोलत होते, तेव्हा शरद पवार यांनी त्यांना थांबवले नाही. शरद पवार यांचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाहीत पण शरद पवार यांचा काँग्रेस आणि शिवसेनेवर परिणाम होणार आहे, या प्रकरणामुळे काँग्रेस आणि शिवसेनेला सेट बॅक बसला आहे. यामुळे आता शिवसेना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगेल.