‘हा काय निर्लज्जपणा आहे…’ म्हटल्यामुळे जयंत पाटील यांचे वर्षभरासाठी निलंबन- नागपूर व मुंबई येथील विधिमंडळाच्या परिसरात त्यांना बंदी

0
281

नागपूर, दि. २२ (पीसीबी) – विधानसभेमध्ये दिशा सालियन, आदित्य ठाकरे आदी विषयांवर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संतापले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ‘हा काय निर्लज्जपणा आहे…’ असे म्हणाले. त्यानंतर सभागृहातले वातावरण एकदम तापले आणि जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी झाली. त्यानंतर त्यांना हिवाळी अधिवेशनासाठी मुंबई व नागपूर विधानभवन परिसरात प्रवेशावर बंदी घालण्यात आली.

गोंधळ जास्त वाढल्याने सभागृह ३० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर पुन्हा काही वेळासाठी सभागृह तहकूब करण्यात आले. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात स्वतः नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि तर नेत्यांची बैठक सुरू झाली. यामध्ये जयंत पाटलांवर निलंबनाची कारवाई करावी की नाही आणि करावी तर किती कालावधीसाठी, यावर नेत्यांनी मंथन केले.

नागपुरात अधिवेशन सुरू झाले तेव्हापासून कामकाजादरम्यान अनेक वेळा अडथळे निर्माण झाले. आजही जयंत पाटलांच्या विरोधात वातावरण तापलेले आहे. सध्या सुरू असलेले अधिवेशन आणि यापुढील अधिवेशनात सहभागी होण्यावर बंदी घालावी, अशी मागणी सभागृहात करण्यात आली. नागपूर व मुंबई येथील विधिमंडळाच्या परिसरात त्यांना बंदी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. त्यानंतर लगेच हा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावानुसार मुंबई आणि नागपूरच्या विधानभवन परिसरात त्यांना बंदी घालण्यात आली आहे.

यानंतर विरोधी पक्षातील सदस्य संतप्त झाले. प्रत्येक लोकप्रतिनिधी त्याच्या परिसरातील लोकांचे प्रतिनिधित्व करीत असतो. त्यांचे प्रश्‍न सभागृहात मांडत असतो. एकदम निलंबन करणे योग्य नाही. जे शब्द जयंत पाटलांनी वापरले, ते अनावधानाने वापरण्यात आले. अध्यक्षांचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. जे काही घडले, ते अनावधानाने घडले आहे. त्यामुळे एकदम त्यांच्यावर बंदी घालू नये. पुनर्विचार व्हावा आणि निलंबन मागे घ्यावे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केले आणि त्यानंतर लगेच सभागृह सोडले. जयंत पाटलांचे निलंबन झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते काय रणनीती आखतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.