चाकण,दि.०५(पीसीबी) – हायड्रोलिक मशीन खरेदी केल्यानंतर त्याची पूर्ण रक्कम न देता तसेच मशीन परत न करता कंपनीची पाच कोटी 77 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ऑक्टोबर 2019 ते 4 डिसेंबर 2023 या कालावधीत हैदराबाद आणि चाकण येथे घडली.
अमित सिंह कुशवाह (वय 46, रा. बाणेर, पुणे) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्री कृष्णराव (रा. हैदराबाद, तेलंगाना) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रुदवी ग्रेनाईटस फर्मचे भागीदार कृष्णराव यांनी अमित सिंह यांच्या कंपनीकडून उधारीवर 6 कोटी 40 लाख 74 हजार रुपये किमतीच्या सहा हायड्रोलिक मशीन खरेदी केल्या. ठरल्या प्रमाणे मशीनचे पैसे अमित सिंह यांना दिले नाहीत. त्यामुळे अमित सिंह यांनी कृष्णराव याच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली. त्यानंतर कृष्णराव याने 69 लाख 30 हजार 61 रुपये अमित सिंह यांना दिले. उर्वरित 5 कोटी 77 लाख 74 हजार रुपये दिले नाहीत. अमित सिंह यांनी पैसे दिले नाही तर मशीन परत करा, असे सांगितले. त्यानंतर कृष्णराव याने मशीन लपवून ठेवत त्यांचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.