हातगाडी लावण्यासाठी खंडणी मागितल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा

0
372

सुसगाव, दि. ३ (पीसीबी) : भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे दररोज 500 रुपये खंडणी मागितली. तसेच भाजी विक्रेत्याकडून 40 हजार रुपये खंडणी घेतली. याप्रकरणी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑगस्ट 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत मोहननगर, सुसगाव येथे घडली.

राजेश अशोक रांगोळे (वय 25, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 2) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रांगोळे हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. ते त्यांची भाजी विक्रीची गाडी मोहननगर येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या पादचारी मार्गावर लावत होते. त्यावेळी आरोपी महिलेने रांगोळे यांच्याकडे दररोज 500 रुपये खंडणी मागितली. आम्ही स्थानिक आहे. आमच्या जमिनी रस्त्यात गेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला खंडणी द्यायची, अशी धमकी आरोपी महिलेने रांगोळे यांना दिली. खंडणी न दिल्यास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार करण्याची धमकी दिली. त्यानुसार आरोपी महिलेने रांगोळे यांच्याकडून 40 हजार रुपये खंडणी स्वरुपात पैसे घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.