मुंबई, दि. २५ (पीसीबी) – हवामान खात्यातर्फे काही दिवसांपूर्वी राज्यात अतिवृष्टी होईल असा इशारा दिला होता. त्यानंतर अनेक ठिकाणच्या शाळांना त्या त्या भागातील जिल्हाधीकाऱ्यांना सुरक्षेच्यादृष्टीने शाळांना सुटी जाहीर केली होती. मात्र, काही भागात तुरळक पाऊस सोडला तर हवामान खात्याचा हा अंदाज सपशेल चुकल्याचे समोर आले. हवामान खात्याच्या या अंदाजवार राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
अजित पवार म्हणाले की, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. मात्र, राज्यात न पाऊस पडतोय ना अंदाज बरोबर येतायेत. मात्र, या अंदाजामुळे त्या त्या भागातील जिल्हाधिकारी शाळांना सुट्टी जाहीर करत आहेत. हवामान खात्याच्या अलर्टनंतर पुणे आणि पिंपरी परिसरातील शाळांना तीन दिवासांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, पाऊस तर पडला नाही.
एकतर पहिलेच गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा व्यवस्थित भरल्या नाही. त्यात आता रेड अलर्टमुळे शाळांना सुट्ट्या देण्यात येत आहेत. मात्र, अंदाज चुकत आहेत. त्यामुळे अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी केंद्राने आणि राज्याने जो काही खर्च करायचा आहे तो करावा त्याला आमचा पाठिंबा असेल. यात फक्त अचूक अंदाज मिळाले पाहिजे हीच अपेक्षा आहे. यावेळी त्यांनी परदेशातील हवामान खात्याच्या अंदाजाचे उदाहरणदेखील दिले. त्यांचे अंदाज खरे ठरतात मात्र, आपल्या हवामान खात्याने रेड अलर्ट दिला की पाऊस गायबच होतो. त्यामुळे अचूक अंदाजांसाठी काय करता येईल यावर ठोस उपाय योजना करण्यात याव्यात असे अजित पवार म्हणाले.